पालखी निघाली वारीला गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

    दिनांक :22-Jul-2026
Total Views |
मुंबई
palkhi nighali varila आषाढी वारीचे भक्तिमय वातावरण, विठ्ठलनामाचा अखंड गजर आणि वारकऱ्यांच्या अढळ श्रद्धेचा भावस्पर्शी अनुभव देणारे ‘पालखी निघाली वारीला’ हे नवे भक्तिगीत रसिकांच्या भेटीला आले आहे. या गीताचे नुकतेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. विठ्ठलनामाच्या गजरात, टाळ-मृदंगाच्या निनादात आणि वारकऱ्यांच्या अखंड भक्तिभावाचे दर्शन घडवणारे हे गीत वारीचा आध्यात्मिक अनुभव श्रोत्यांपर्यंत पोहोचवत आहे.
 

palkhi nighali varila marathi song launched by eknath shinde shankar mahadevan and reeva rathod 
या भक्तिगीताला सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन आणि मधुर आवाजाची गायिका रीवा राठोड यांनी आपल्या सुरांनी समृद्ध केले आहे. ज्येष्ठ गायक-संगीतकार रूप कुमार राठोड आणि गायिका सुनाली राठोड यांची कन्या असलेल्या रीवा राठोडने याच गीताच्या माध्यमातून प्रथमच मराठी गायन केले असून, तिच्या सुरेल आवाजामुळे या भक्तिगीताला भावस्पर्शी उंची प्राप्त झाली आहे. या गीताला ज्येष्ठ संगीतकार रूप कुमार राठोड यांनी संगीत दिले असून, विठ्ठलभक्ती, श्रद्धा आणि वारकरी परंपरेचे सार डॉ. दीपक वझे यांनी आपल्या शब्दांत प्रभावीपणे मांडले आहे. गाण्याची ध्वनिचित्रफीत सौ. श्वेता परुळकर यांनी साकारली असून, हे गीत डीएफएफने प्रस्तुत केले आहे.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने प्रदर्शित झालेल्या या गीतातून वारकरी संप्रदायाची भक्ती, एकता आणि समृद्ध परंपरेची अनुभूती प्रेक्षकांना मिळणार आहे. ‘विठ्ठल… विठ्ठल…’ या नामघोषासह पालखी सोहळ्याचे भव्य दर्शन घडवणारे हे गीत प्रत्येक भक्ताच्या मनात भक्तीचा दीप प्रज्वलित करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
या गीताविषयी बोलताना गायक शंकर महादेवन म्हणाले, “'पालखी निघाली वारीला' हे गाताना मला प्रत्यक्ष वारीचा अनुभव घेत असल्यासारखे वाटले. विठ्ठलभक्ती, वारकऱ्यांचा उत्साह आणि त्या वातावरणातील सात्त्विक ऊर्जा या गीतातून व्यक्त करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.”
गायिका रीवा राठोड म्हणाल्या, “वारी ही भावनांची आणि श्रद्धेची अखंड यात्रा आहे. अशा पवित्र भावनेवर आधारित गीताचा भाग होता आले, ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. हे गीत ऐकताना प्रेक्षक विठ्ठलनामात तल्लीन झाल्याचा अनुभव निश्चितच घेतील, असा मला विश्वास आहे.”
a