तभा वृत्तसेवा
उमरखेड,
statue-struggle-committee : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जागेसाठी तसेच पुतळ्याभोवती असलेले अतिक्रमण हटविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा संघर्ष समितीने आंदोलने केली. त्यामुळे छत्रपतींच्या पुतळ्यासाठी जागा उपलब्ध होऊन पुतळा उभा राहिला. परंतु अद्याप पेट्रोल पंपाचे अतिक्रमण हटलेले नाही. त्यामुळे काही सर्वपक्षीय राजकारणी छत्रपतींच्या पुतळ्याचे श्रेय घेण्यासाठी आंदोलन करीत आहेत असा आरोप करीत, जोपर्यंत पुतळ्याजवळील पेट्रोल पंप हटवणार नाही तोपर्यंत पुतळ्याचे अनावरण होऊ देणार नाही, असा निर्धार पुतळा संघर्ष समितीने गुरुवार, 22 जुलै रोजी पत्रपरिषदेत जाहीर केला.
उमरखेडमध्ये महाराजांच्या पुतळा व पेट्रोल पंपाचे अतिक्रमण यावर प्रशासन व्यस्त असताना तसेच काही दिवसांपूर्वी पंपाचे अतिक्रमण हटवण्यासाठी समिती बाहेरच्या लोकांनी बेमुदत उपोषण केले. त्या उपोषण दरम्यान सर्वपक्षीय राजकारणी मंडळी जमल्याने हे आंदोलनच संशयास्पद असल्याचे सांगत यावेळी संघर्ष समितीने सर्वपक्षीय नेते व प्रशासनावर आगपाखड केली.
यावेळी समितीचे गजानन देशमुख म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा समितीच्याच आंदोलन व मागणीमुळे शिवाजी महाराज चौकात उभारण्यात आला. पुतळ्याच्या बाजूला असलेल्या पेट्रोल पंप हटवण्यासाठीसुद्धा आंदोलन केले. परंतु जिल्हाधिकाèयांनी पंपाची लीज वाढवून दिली.
त्यानंतर समितीने आयुक्तांकडे याचिका दाखल केली. मागील अनेक वर्षे समितीने आंदोलन केले. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने 2010 च्या नकाशावरून मोजणी केली. परंतु ती मान्य नसून प्रशासन कागदी घोडे नाचवत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
संघर्ष समितीची भूमिका प्रामाणिक असून अतिक्रमण हटवण्यासाठी सदस्यांनी तेरा दिवस तुरुंगवास भोगला. सर्व प्रशासन पेट्रोल पंप मालकाच्या तालावर नाचत असल्याचा आरोप करीत कोणत्याही विभागाची परवानगी न घेता टाकीचे बांधकाम 2018 मध्ये करण्यात आले. संपूर्ण पेट्रोल पंप अतिक्रमणात असून ते काढण्यासाठी समितीतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
येणाèया काळात मोठ्या प्रमाणात जनआंदोलन करून पेट्रोल पंप अतिक्रमण काढण्यास भाग पाडू, असा इशारा देत प्रशासन चुकीची मोजणी करून समितीची फसवणूक करत असल्याचा आरोपसुद्धा त्यांनी केला. पेट्रोल पंपाची जागा 303 चौरस मीटर आहे. मार्जिन लाईन ठेवूनच पंपाला जागा द्यायला पाहिजे. जोपर्यंत पेट्रोल पंप हटवण्याचा निर्णय लागत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा निर्धारसुद्धा यावेळी त्यांनी व्यक्त केला.
संघर्ष समितीने यापूर्वी केलेल्या आंदोलनात कुठलाच पक्ष समितीसोबत नसून आपली राजकीय पोळी भाजण्याकरिता शिवाजी महाराजांचा पुतळा, तसेच अतिक्रमण मुद्याचा आसरा घेत असल्याचा घणाघात करीत उपविभागीय अधिकारी कागदी घोडे नाचवून शिवप्रेमींची दिशाभूल करीत असल्याचा आरोपही यावेळी समितीने केला.
या पत्रपरिषदेला संघर्ष समितीचे अध्यक्ष अभय पवार, सिद्धेश्वर जगताप, राहुल मोहितवार, गोपाळ झाडे, बसवेश्वर क्षीरसागर, विनोद पोंगाने, संतोष दासरी उपस्थित होते.