मुंबई
prabhas चित्रपटसृष्टीत स्टारडमचा विषय निघाला की बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान, दक्षिणेतील सुपरस्टार प्रभास, थलपती विजय, अल्लू अर्जुन आणि ज्युनिअर एनटीआर यांसारख्या दिग्गज कलाकारांची नावे आघाडीवर घेतली जातात. मात्र, प्रेक्षकांची पसंती काळानुसार बदलत असल्याने सध्या देशातील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता कोण, याबाबत कायमच उत्सुकता असते.
याच पार्श्वभूमीवर Ormax Media ने जून 2026 साठीची ‘Stars India Loves’ ही लोकप्रियता रँकिंग जाहीर केली आहे. या यादीत अनेक दिग्गज कलाकारांनी स्थान मिळवले असून, यावेळीही ‘बाहुबली’ फेम सुपरस्टार प्रभासने पहिला क्रमांक पटकावला आहे. प्रभासने बॉलिवूडचा किंग शाहरुख खान आणि तमिळ सुपरस्टार थलपती विजय यांना मागे टाकत अव्वल स्थान कायम राखले आहे.Ormax Media च्या ‘Stars India Loves’ रँकिंगमध्ये प्रेक्षकांची पसंती, कलाकारांची लोकप्रियता आणि त्यांच्याबद्दलची उत्सुकता या घटकांचा विचार केला जातो. त्यामुळे चित्रपटसृष्टीत या यादीला विशेष महत्त्व दिले जाते. प्रभासची लोकप्रियता केवळ दक्षिण भारतापुरती मर्यादित नसून देशभरात तसेच परदेशातही त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. त्याच्या प्रत्येक नव्या चित्रपटाच्या घोषणेनंतर सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगते, हे त्याच्या वाढत्या स्टारडमचे उदाहरण मानले जाते.
प्रभासला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यात ‘बाहुबली’ या चित्रपटाची भूमिका महत्त्वाची ठरली. या चित्रपटाने भारतीय सिनेमाला आंतरराष्ट्रीय पातळीवर नवी ओळख मिळवून दिली. त्यानंतर ‘सालार’ आणि ‘कल्कि 2898 AD’ यांसारख्या भव्य चित्रपटांमधून प्रभासने केवळ अॅक्शन स्टार म्हणून नव्हे, तर मोठ्या आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी विश्वासार्ह अभिनेता म्हणूनही आपले स्थान मजबूत केले आहे. त्याचे दमदार व्यक्तिमत्त्व आणि विविध प्रकारच्या भूमिका साकारण्याची क्षमता यामुळे त्याला इतर कलाकारांपेक्षा वेगळे स्थान मिळाले आहे.दरम्यान, या यादीत प्रभास अव्वल असला तरी शाहरुख खानची लोकप्रियता अद्याप कायम आहे. ‘पठाण’, ‘जवान’ आणि ‘डंकी’ या सलग यशस्वी चित्रपटांमधून शाहरुखने दमदार पुनरागमन करत बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले. भारतासह जगभरातील प्रेक्षकांमध्ये त्याची मोठी क्रेझ कायम आहे. त्याचा आगामी ‘किंग’ हा चित्रपटही सध्या चर्चेत असून, चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.प्रभास, शाहरुख खान आणि थलपती विजय यांच्यातील लोकप्रियतेची ही चुरस भारतीय चित्रपटसृष्टीतील बदलते समीकरण आणि कलाकारांच्या वाढत्या देशव्यापी प्रभावाचे चित्र स्पष्ट करते.