मालेगाव
medshi forest department तालुयातील मेडशी येथील वन विभागाचा लाकूड डेपो सध्या देखभाल आणि सुरक्षेअभावी चर्चेचा विषय ठरला आहे. डेपोचे प्रभारी अधिकारी नियमितपणे उपस्थित राहत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला असून, लाखो रुपयांची सरकारी मालमत्ता अक्षरशः वार्यावर सोडण्यात आल्याची भावना परिसरात व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर वन विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी तातडीने चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी नागरिक, शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.
माहितीनुसार, मेडशी येथील डेपोमध्ये वन विभागाचे लाकूड, आदिवासी बांधवांचे लाकूड, विविध कारवायांमध्ये जप्त करण्यात आलेली दुचाकी, तीनचाकी, ट्रक तसेच इतर सरकारी साहित्य साठवून ठेवण्यात आले आहे. या मालमत्तेची किंमत लाखो रुपयांच्या घरात असल्याचे सांगितले जात असले तरी तिच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना पुरेशा प्रमाणात होत आहेत का, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. डेपोला लागून हनुमानवाडी परिसर असून, अकोला रोडलगत हे ठिकाण वर्दळीच्या भागात आहे. याच परिसरातून शेतकर्यांसाठीचा जुना मार्ग जात असल्याने दिवसरात्र नागरिकांची ये-जा सुरू असते. अशा परिस्थितीत चोरी, आग, अपघात किंवा इतर अनुचित घटना घडल्यास जबाबदारी कोण स्वीकारणार, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.
विशेष म्हणजे, यापूर्वी उन्हाळ्यात या डेपोमध्ये आग लागल्याची घटना घडली होती. त्यावेळी मोठी हानी टळली असली तरी त्यानंतर सुरक्षाव्यवस्था अधिक सक्षम करण्यात आली का, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. सरकारी मालमत्तेच्या सुरक्षेबाबत प्रशासन उदासीन का आहे, असा प्रश्न उपस्थित करत नागरिकांनी या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. वन विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी डेपोची प्रत्यक्ष पाहणी करून सुरक्षा व्यवस्थेचे लेखापरीक्षण करावे, संबंधित अधिकार्यांच्या उपस्थितीची पडताळणी करावी आणि सरकारी मालमत्तेच्या संरक्षणासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.
चौकशीची मागणी करणारे प्रश्न
* लाखो रुपयांची सरकारी मालमत्ता खरोखर सुरक्षित आहे का?
* डेपोमध्ये जबाबदार अधिकारी नियमितपणे उपस्थित असतात का?
* आग लागण्याच्या पूर्वीच्या घटनेनंतर कोणत्या सुधारणा करण्यात आल्या?
* पावसाळ्यात लाकूड व इतर साहित्याचे संरक्षण कसे केले जात आहे?
* वरिष्ठ अधिकार्यांकडून डेपोची नियमित तपासणी केली जाते का?