रा. स्व. संघ शताब्दीनिमित्त वणीत युवा संमेलन उत्साहात

-121 युवकांचा उत्स्फूर्त सहभाग -त्याग, सेवा व समर्पणाची भावना जोपासण्याचे आवाहन

    दिनांक :22-Jul-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
वणी, 
wani-youth-conference : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांच्या मालिकेतील युवा संमेलन येथे उत्साहपूर्ण वातावरणात झाले. या संमेलनात 16 ते 35 वयोगटातील महाविद्यालयीन विद्यार्थी व विविध क्षेत्रातील व्यावसायी अशा एकूण 121 युवकांनी सहभाग घेतला. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून रा. स्व. संघाचे प्रांत शारीरिक प्रमुख प्रशांत दाणी उपस्थित होते.
 

y22July-Wani 
 
मार्गदर्शन करताना त्यांनी सध्याच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीत युवकांनी जागरूक राहून देश, धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी त्याग, सेवा व समर्पणाची भावना जोपासावी, स्वतःत सकारात्मक बदल घडवून आणावा आणि संघाच्या राष्ट्रकार्याशी जोडले जावे, असे आवाहन केले. चारित्र्यसंपन्न युवकांमध्येच देशाची दशा आणि दिशा बदलण्याचे सामर्थ्य असल्याचे त्यांनी नमूद केले.
 
 
कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्रात नगर संघचालक किरण बुजोने यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 100 वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेत संघाच्या पूर्व सरसंघचालकांच्या जीवनकार्याची माहिती उपस्थितांना दिली. प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय जिल्हा कार्यवाह दीपक नवले यांनी करून दिला. युवा संमेलन आयोजित करण्यामागील उद्देश स्पष्ट करताना युवकांनी राष्ट्रनिर्मितीत सक्रिय सहभाग घेण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. यावेळी व्यासपीठावर तालुका संघचालक हरिहर भागवत यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा व्यवसाय कार्यप्रमुख प्रमोद सप्रे यांनी केले.
 
 
सुमारे पाच तास चाललेल्या या संमेलनात शाखा प्रात्यक्षिके, संवाद सत्र, चर्चासत्र, देशभक्तीपर गीत, विविध मैदानी खेळ अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. युवकांनी या सर्व उपक्रमांत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. संघाच्या विविध वाद्यांचे प्रदर्शन, पुस्तक प्रदर्शन आणि संघाच्या सेवा कार्याची माहिती देणारे फलकही आकर्षणाचे केंद्र ठरले.
 
 
या संमेलनात नगर, तालुका, जिल्हा तसेच व्यवस्थेतील सुमारे 70 स्वयंसेवकांनी विविध जबाबदाèया सांभाळल्या. प्रथमच सहभागी झालेल्या अनेक युवकांनी कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत भविष्यात संघाच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय योगदान देण्याची इच्छा व्यक्त केली.