गोरगरीब शेतकरी कुटुंबातील स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थ्यांना आ. संजय गायकवाड यांचा दिलासा

*जिजामाता प्रेक्षागारावरील मैदान शुल्क स्वतःच्या खिशातून भरणार

    दिनांक :22-Jul-2026
Total Views |
बुलढाणा, 
sanjay-gaikwad : सैन्य भरती, पोलीस भरती तसेच विविध शासकीय सेवांच्या स्पर्धा परीक्षांसाठी दिवस-रात्र मेहनत घेणार्‍या गोरगरीब शेतकरी कुटुंबातील तरुण-तरुणींना बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आ. संजय गायकवाड यांनी मोठा दिलासा दिला आहे. जिजामाता प्रेक्षागारावरील मैदानाच्या देखभाल शुल्कापोटी आकारण्यात येणारे प्रति विद्यार्थी २०० रुपये मासिक शुल्क स्वतःच्या खिशातून भरण्याची जबाबदारी आ. संजय गायकवाड यांनी स्वीकारली आहे.
 
 
 
jk
 
 
 
जिल्हा क्रीडा विभागाच्या अखत्यारीतील जिजामाता प्रेक्षागार येथे सैन्य भरती, पोलीस भरती तसेच इतर शासकीय सेवांच्या तयारीसाठी शेकडो युवक-युवती दररोज सराव करतात. यातील बहुतांश विद्यार्थी हे ग्रामीण भागातील गोरगरीब, कष्टकरी आणि शेतकरी कुटुंबातील असून कोणत्याही खासगी अकॅडमीचा आधार न घेता स्वतःच्या जिद्दीवर स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत. मात्र मैदानाच्या देखभालीसाठी प्रति महिना २०० रुपये शुल्क भरणे बंधनकारक करण्यात आल्याने अनेक विद्यार्थ्यांसमोर आर्थिक अडचण निर्माण झाली. घरची हलाखीची परिस्थिती, राहणीमान व इतर खर्च सांभाळत तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी ही रक्कमही मोठा भार ठरत असल्याने असंख्य युवक-युवतींनी मंगळवारी दि. २१ जुलै शिवसेना मातोश्री जनसंपर्क कार्यालय गाठून आपल्या व्यथा मांडल्या.
 
 
कोणत्याही विद्यार्थ्याचा सराव पैशाअभावी थांबू देणार नाही. मैदानाच्या देखभालीसाठी जे काही शुल्क द्यावे लागेल ते मी स्वतः माझ्या खिशातून भरतो. तुम्ही कोणतीही चिंता न करता नियमित सराव करा, मेहनत घ्या आणि आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करा. आमदारांच्या या आश्वासनामुळे उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. अनेक विद्यार्थ्यांनी भावूक होत आ. संजय गायकवाड यांचे मनःपूर्वक आभार मानले. याप्रसंगी युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड, नगरसेवक बबलू मावतवाल, जीवन उबरहंडे, स्वीय सहाय्यक श्रीकृष्ण शिंदे, ज्ञानेश्वर खांडवे, रामभाऊ जाधव,तसेच मोठ्या संख्येने युवक-युवती व नागरिक उपस्थित होते.