चित्तोडगड,
savalia-seth-temple : राजस्थानमधील चित्तोडगड जिल्ह्यातील प्रसिद्ध श्री सावळिया सेठ मंदिरात भाविकांकडून दानाचा नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे. गेल्या चार महिन्यांत मंदिराला १५३ कोटी रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम, चार किलोपेक्षा जास्त सोने आणि ३८६ किलो चांदी दान म्हणून प्राप्त झाली आहे.
आर्थिक वर्ष २०२६-२७ मधील एप्रिल ते जुलै या केवळ चार महिन्यांच्या कालावधीत मंदिरात १५३ कोटी ५९ लाख ७७ हजार २०९ रुपयांचे दान जमा झाले आहे. यासोबतच भाविकांनी ४ किलो २७३ ग्रॅम सोने आणि ३८६ किलो ५९ ग्रॅम चांदी देवाला अर्पण केली आहे.
विशेष म्हणजे आषाढ महिन्यात केवळ एकाच महिन्यात ३८ कोटी २३ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा झाली असून, हा आषाढ महिन्यातील आतापर्यंतचा सर्वांत मोठा विक्रम ठरला आहे.
वाढत्या दानाच्या पार्श्वभूमीवर मंदिर व्यवस्थापनाने पैसे मोजण्याची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुरक्षित केली आहे. श्री सावळिया सेठ यांना भगवान श्रीकृष्णाचे रूप मानले जाते. भाविक त्यांना आपले आराध्यदैवत तसेच व्यापारातील भागीदार मानून मोठ्या श्रद्धेने दान अर्पण करतात.