मुंबई
sayaji shinde विद्यार्थी आपल्या हक्कांसाठी आणि न्यायाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरले असताना त्यांच्यावर करण्यात आलेल्या लाठीचार्जमुळे देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. आंदोलन करणाऱ्या तरुणांची प्रमुख मागणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासह शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्याची आहे. या आंदोलनाला राजकीय पक्षांसह अनेक सेलिब्रिटींकडूनही पाठिंबा मिळत असून, मराठी अभिनेते सयाजी शिंदे यांनीही यावर प्रतिक्रिया देत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत आपली भूमिका मांडली आहे.
एका मुलाखतीत विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जबाबत बोलताना सयाजी शिंदे म्हणाले, “आपल्याच माणसाने आपल्यावरच लाठीचार्ज करणे योग्य नाही. शेवटी ही आपलीच माणसं आहेत. ती आपल्या चांगल्यासाठी, भविष्यासाठी भांडत आहेत. ही लोकशाही आहे, त्यामुळे अशा पद्धतीने लाठीचार्ज करायला नको होता. सरकारने विद्यार्थ्यांचा विश्वास निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण केली पाहिजे, म्हणजे सध्या जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती टाळता येईल.”
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर प्रतिक्रिया देताना सयाजी शिंदे म्हणाले, “राजीनामा म्हणजे व्यवस्था बदलली पाहिजे. ती व्यक्ती बदलली पाहिजे. कारण काय होत आहे याकडे त्यांनी लक्ष दिले नाही. चांगली सेवा मिळावी म्हणून आपण सरकार निवडून देतो. त्यामुळे सरकारनेही त्याच पद्धतीने काम केले पाहिजे. असे झाले तर अशी आंदोलने कधीच होणार नाहीत.”यावेळी सयाजी शिंदे यांनी सोनम वांगचुक यांच्या कार्याचेही कौतुक केले. ते म्हणाले, “मी सोनम वांगचुक यांना खरंच मानतो. अशी माणसं फार दुर्मिळ असतात. मी त्यांना प्रत्यक्ष भेटलो आहे, बोललो आहे. आमचे विचारही जुळले. अशी माणसं आपल्यापेक्षा चांगली आहेत, असे वाटते आणि अशा व्यक्तींची आपल्या देशाला खरोखर गरज आहे. सरकारने या सर्व गोष्टींचा विचार करायला हवा. सरकार आपले असते, आपण निवडून दिलेले असते. त्यामुळे अशा प्रकारे चालणार नाही.”विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर संवेदनशील भूमिका घेत सयाजी शिंदे यांनी शिक्षण व्यवस्था, प्रशासन आणि लोकशाही प्रक्रियेतील संवादाचे महत्त्व अधोरेखित केले आहे.