मैत्रिणीला व्हिडीओ कॉल केल्यामुळेच गोळीबार

- दोन्ही टोळ्यांतील १० आरोपींना अटक - पिस्तूल, काडतुसांसह सहा लाखांचा मुद्देमाल जप्त

    दिनांक :22-Jul-2026
Total Views |
अनिल कांबळे,
नागपूर, 
shooting-due-to-video-call-to-friend : पाचपावलीतील कुख्यात गुन्हेगार अजय चिचखेडे याच्या टोळीमधील एका सदस्याने जगदीश गोखले टोळीतील एका सदस्याच्या मैत्रिणीला व्हिडीओ कॉल केला. याच कारणावरून दोन्ही टोळ्या शनिवार मार्केटमध्ये समोरासमोर आल्या आणि गोळीबार करण्यात आला. या प्रकरणात दोन्ही टोळ्यांतील १० युवकांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याजवळून पिस्तूल, काडतूस आणि कारसह सहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणातील फरार आरोपी जगदीश गोखले, राहुल सिरसाठ व त्यांच्या साथीदारांचा शोध सुरू आहे. या टोळीतील आरोपींना पाचपावली पोलिसांनी पायी फिरवून चांगलाच धडा शिकवला, हे विशेष.
 

k 
 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ जुलैच्या मध्यरात्री सुमारे २ वाजता शनिवार मार्केट येथील कमाल चौकात क्रिश ठाकूरच्या वाढदिवसानिमित्त केक कापल्यानंतर गोखले टोळीतील सदस्यांनी अजय चिंचखेडे (२९) याला शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याच्यावर हल्ला करण्यात आला. झटापटीदरम्यान एका आरोपीने पिस्तूल काढून अजयवर रोखले. पिस्तूल हिसकावून घेण्याच्या प्रयत्नात गोळी सुटली. मात्र ती जमिनीत घुसल्याने मोठी दुर्घटना टळली. गोळीबाराचा आवाज ऐकून इतर साथीदार धावत येताच आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
 
तपासादरम्यान पोलिसांनी राकेश नारायण भुरे (२१, लालगंज-शांतीनगर), नचिकेत ऊर्फ छोटू भांजा केशव झाडे (१९, नाईक तलाव), मयूर ऊर्फ दातऱ्या किशोर अडतिया (लालगंज), अंकित ऊर्फ बिट्टू सूर्यकांत चावडे (२६, तांडापेठ) आणि चंद्रशेखर ऊर्फ चंदू सदाशिव पौनीकर (२०, लालगंज चकना चौक) यांना अटक केली. या प्रकरणात एकूण १४ जणांना आरोपी करण्यात आले असून, त्यापैकी १० जणांना अटक झाली आहे. फरार आरोपी जगदीश गोखले हा घटनेच्या दिवशीच कारागृहातून सुटून बाहेर आल्याची माहिती पोलिस उपायुक्त राहुल मदने यांनी दिली. दोन्ही टोळ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई करण्याची तयारी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. प्राथमिक तपासात, एका युवतीला टोळीतील युवकाने व्हिडीओ कॉल केल्यामुळे वाद निर्माण झाला होता. या वादाला वर्चस्वाच्या संघर्षाची जोड मिळाल्याने हा हिंसक प्रकार घडल्याचे तपासात समोर आले आहे.पुढील तपास ठाणेदार अनिरुद्ध पुरी आणि पथक करीत आहेत.