श्याम इंडोफॅबच्या गोदामातून ३७ लाखांच्या यंत्रसामग्रीची चोरी

नांदगाव पेठ टेक्सस्टाईल पार्क मधली गिरण

    दिनांक :22-Jul-2026
Total Views |
नांदगाव पेठ, 
shyam-indofab-warehouse-theft : येथील पंचतारांकित एमआयडीसीमध्ये गेल्या चार वर्षांपासून बंद असलेल्या श्याम इंडोफॅब प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या गोदामातून तब्बल ३७ लाखांची औद्योगिक यंत्रसामग्री चोरी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी नांदगाव पेठ पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
 
 
jk
 
 
 
माहितीनुसार, कंपनीचे मुख्य व्यवस्थापक जगदीशकुमार पारुळकर (वय ४९, रा. रायपूर, छत्तीसगड) यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. प्राथमिक तपासात ही चोरी १६ ते १७ जुलैदरम्यान झाल्याचे समोर आले आहे. मंगळवारी पारुळकर हे कंपनीच्या पाहणीसाठी आले होते. सायंकाळी त्यांनी गोदामाची तपासणी केली असता, तेथे ठेवण्यात आलेली महागडी यंत्रसामग्री गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर गोदामातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली असता चोरीची घटना उघडकीस आली. चोरट्यांनी गोदामातून सुमारे १० लाखाचे नऊ सर्क्युलर फिटिंग मशिन्स, १० लाखांची एक सेंटेक्स ड्रायर मशीन, पाच लाखांची एक लाफेर संगणक संच, पाच लाखांचा एक बेन्को संगणक संच, पाच लाखांचा एक ईव्हीए स्ट्रेंगर मशीन तसेच दोन लाखांची एक ग्रे ओपनिंग मशीन असा एकूण ३७ लाखांचा ऐवज लंपास केला आहे. पंचतारांकित एमआयडीसीतील एका मोठ्या औद्योगिक युनिटमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर चोरी झाल्याने औद्योगिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
 
चोरी करणाऱ्या व्यक्तींना गोदामाची रचना आणि तेथील यंत्रसामग्रीची संपूर्ण माहिती असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. बुधवारी नांदगावपेठ पोलिस आणि न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) पथकाने घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू केला आहे. पोलिस अज्ञात आरोपींचा शोध घेत आहेत. याठिकाणी तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांची नांदगाव पेठ पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली आहे.
 
 
चोरीच्या घटनेवर संशय
 
 
ही कंपनी निर्मल उज्ज्वल समूहाने मागील वर्षी विकत घेतली होती. परंतु, काही कालावधीत ती बंद पडली. सध्या निर्मल उज्वल को - ऑप सोसायटीवर गंडांतर आल्यामुळे ठेविदारांची ओरड सुरू असतानाच हा सर्व प्रकार घडल्याने या चोरीच्या घटनेकडे संशयाच्या नजरेने बघितल्या जात आहे.