अग्रलेख
devendra fadanvis एकोणविसाव्या शतकात राष्ट्रवादाची ओळख स्वातंत्र्याच्या लढ्याने ठरत होती. विसाव्या शतकात ती लोकशाही संस्थांच्या बळकटीवर ठरू लागली. एकविसाव्या शतकाने राष्ट्रवादाला नवा अर्थ दिला आहे. आता एखाद्या राष्ट्राचे सामर्थ्य त्याच्या लष्करी शक्तीइतकेच त्याच्या अर्थव्यवस्थेवर, पायाभूत सुविधांवर, संशोधनावर आणि नागरिकांच्या उत्पादक क्षमतेवर अवलंबून आहे. लष्करी शक्ती हा विषय सोडला तर इतर सारे राष्ट्रांएवढेच राज्यांना किंवा प्रांतांनाही लागू पडते. विकास हा आता केवळ अर्थकारणाचा विषय उरलेला नाही; तो राष्ट्रीय स्वाभिमानाचा विषय बनला आहे. भारताच्या विकासाकडे आपण सारे तसेच पाहतो. महाराष्ट्राच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्थान याच संदर्भात पाहावे लागते. कारण आज फडणवीसांचा जन्मदिवस आहे आणि त्यांना त्यानिमित्त शुभेच्छा देताना, या धुरंधर विकासपुरुषाच्या कर्तबगारीचे कौतुक करण्याचे निमित्त आहे.
विकास हा आपल्याकडे वापरून-वापरून पार बोथट झालेला शब्द. निवडणुकीत विकास असतो, अर्थसंकल्पात विकास असतो, सरकारी जाहिरातीत विकास असतो आणि प्रत्येक नेत्याच्या भाषणातही विकास असतोच. पण, विकास म्हणजे नेमके काय, हे अनेकांना कळत नाही. स्वातंत्र्यानंतर लोकतांत्रिक संस्था उभ्या करणे, संविधान रुजवणे, निवडणुका घेणे, न्यायव्यवस्था सक्षम करणे हे राष्ट्रनिर्मितीचे अर्थात विकासाचे टप्पे ठरले. आताचा काळ वेगळा आहे. जगातील राष्ट्रे किंवा राज्ये आता उत्पादन व निर्मितीच्या क्षमतेवर अर्थात अर्थकारणाच्या संदर्भात एकमेकांशी स्पर्धा करीत आहेत. कोण अधिक वेगाने निर्णय घेतो, कोण अधिक भांडवल आकर्षित करतो, कोण उत्पादकता व संशोधनाला चालना देतो, कोण उद्योगांसाठी अनुकूल वातावरण निर्माण करतो या प्रश्नांची उत्तरेच त्या राष्ट्राचे किंवा राज्याचे स्थान ठरवतात. आधुनिक राष्ट्रवादाला विकासाचा तोंडवळा प्राप्त झाला आहे तो असा. फडणवीसांच्या कार्यशैलीत या स्थित्यंतराचे दर्शन घडते.
महाराष्ट्राला उद्योगांची, सहकाराची, शिक्षणाची व समाज सुधारणांची परंपरा आहे. तरीही गेल्या काही दशकांत राज्याने आपल्या नेतृत्वाच्या स्थानाबद्दल विशिष्ट गृहीतके स्वीकारली होती. आपण इतरांच्या पुढेच आहोत, त्यामुळे विशेष काही करण्याची गरज नाही, अशी आत्मसंतुष्ट मानसिकता नकळत तयार झाली होती. दरम्यान, इतर राज्यांनी वेग पकडला. गुंतवणुकीसाठी स्पर्धा सुरू झाली. शहरे बदलू लागली. जागतिक अर्थव्यवस्थेचे स्वरूप बदलले. अशा वेळी महाराष्ट्रालाही स्वतःचा विचार नव्याने करावा लागणार होता. फडणवीस यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र शासनाचे निर्णय या बदलत्या वास्तवातून जन्माला आलेले दिसतात आणि त्यामुळेच त्यांच्या निर्णयांचे दूरगामी परिणाम होताना आपण सारे पाहत आहोत. भविष्यातही त्यांच्या निर्णयांचे सकारात्मक परिणाम दिसणार आहेतच.
राजकारणात काही नेते परिस्थितीशी जुळवून घेतात; काही परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करतात. पहिल्या प्रकारचे नेतृत्व व्यवस्थापन करीत काळ काढत असते. दुसऱ्या प्रकारचे नेतृत्व दिशा देते. देवेंद्र फडणवीस हे राज्याच्या व्यवस्थापनासह त्याला दिशा देणारे नेते आहेत. त्यांनी महाराष्ट्राला पुढील काही दशकांच्या चौकटीत पाहण्याचा प्रयत्न केला आणि तशी दिशा दिली आहे. महाराष्ट्राला त्यांनी घटक राज्याच्या पातळीवर न ठेवता जगाच्या स्पर्धेत उतरविले आहे. पायाभूत सुविधा म्हणजे सरकारी खर्च ही जुनी समजूत मोडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. चांगली संपर्क व्यवस्था, आधुनिक शहरे, वेगवान सार्वजनिक वाहतूक, सक्षम लॉजिस्टिक्स, औद्योगिक कॉरिडॉर, डिजिटल पायाभूत रचना ही सर्व भविष्यातील संपत्ती-समृद्धी निर्माण करणारी साधने आहेत, हा विचार त्यांनी सातत्याने मांडला. जगात ज्या समाजांनी पायाभूत सुविधांमध्ये धाडसी गुंतवणूक केली, तेच पुढे उद्योग, संशोधन आणि रोजगाराच्या क्षेत्रात आघाडीवर राहिले. महाराष्ट्राची त्याच दिशेने वाटचाल सुरू झाली यामागे फडणवीसांची दूरदृष्टी आहे. जगात जेव्हा-केव्हा भारताचा विचार किंवा होतो तेव्हा महाराष्ट्राचा होतोच, हे फडणवीसांच्या दूरदृष्टीचे यश आहे.
फडणवीस यांच्या विकासदृष्टीतील एक महत्त्वाचा पैलू म्हणजे भौगोलिक वास्तवाकडे पाहण्याची त्यांची पद्धत. त्यांच्यासाठी विदर्भाचे मागासलेपण किंवा मराठवाड्याचा दुष्काळ ही मर्यादा नाही. राज्याचे विविध भाग विकसित होण्यासाठी प्रयत्न करू शकतात आणि त्यासाठी काय करायला हवे, हे फडणवीसांनी दाखवून दिले. योग्य संपर्क-समन्वय, सक्षम पायाभूत सुविधा आणि नियोजन यांच्या आधारे आर्थिक नकाशे बदलू शकतात, यावर त्यांचा विश्वास आहे. गडचिरोली जिल्ह्यात घडून येत असलेले मन्वंतर हे त्याचे ताजे उदाहरण. नक्षलवादामुळे त्रस्त असलेल्या जिल्ह्यात नक्षलवादाचा बीमोड होईल आणि विकासाचा रथ गतिमान होईल, याची कल्पनाही कुणी करत नव्हते. ते घडते आहे आणि त्यामागे देवेंद्रजींची दृष्टी आहे. त्यांचाच निर्धार आहे. देवेंद्रजींच्या कार्यपद्धतीचा आणखी एक गुण म्हणजे निर्णयक्षमता. विकासाचे प्रकल्प फक्त पैशांअभावी अडकत नाहीत; ते निर्णयांअभावी अडकतात. विलंब हा आपल्या प्रशासकीय संस्कृतीचा भाग आहे.devendra fadanvis शासन वेळेत निर्णय घेऊ शकत नाही, अशी भावना निर्माण झाली की गुंतवणूकदार सावध होतो, उद्योग मागे हटतात आणि नागरिकांचा विश्वास कमी होतो. मग विकास प्रकल्प रखडतात आणि आरोप-प्रत्यारोपांचे तेवढे पीक येते. अशा स्थितीत निर्णय प्रक्रियेला गती देणे हेही विकासाचेच एक रूप असते. फडणवीस यांच्या शैलीत हा आग्रह सातत्याने दिसतो. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. ते विषयांच्या तांत्रिक तपशिलांत शिरतात. आधुनिक काळात निव्वळ भाषणांवर राज्यकारभार करता येत नाही. अर्थव्यवस्था, शहरीकरण, जलव्यवस्थापन, ऊर्जा, कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा, पर्यावरण, जागतिक गुंतवणूक या सर्व क्षेत्रांतील बदल समजून घेणे नेतृत्वासाठी आवश्यक आहे. फडणवीस यांना अशा अनेक विषयांत गती आहे आणि नवे समजून घेण्यात त्यांना स्वारस्यही आहे. काही नेते सतत स्वतःच बोलतात. इतरांना बोलू देत नाहीत. आपल्याला काहीही समजून घेण्याची आवश्यकता नाही, अशी त्यांची वृत्ती बनते. गेली अनेक वर्षे महाराष्ट्राचे नेतृत्व करताना देवेंद्रजींनी विषय समजून घेण्याची सवय अंगी बाणवून घेतलेली आहे. त्यांच्या माघारी अनेक सनदी अधिकारी व उद्योगपती या कारणासाठी त्यांचे कौतुक करतात. त्यांचा उद्देश स्पष्ट असतो आणि तो म्हणजे काम दर्जेदार आणि वेगाने झाले पाहिजे. फडवीसांनी समृद्धी महामार्ग, अटल सेतू अशा अनेक प्रकल्पांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या भविष्यात गुंतवणूक केली आहे. त्यांच्या विकासदृष्टीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी महाराष्ट्राला एक राज्य म्हणून नव्हे, तर जगातील स्पर्धक अर्थव्यवस्था म्हणून समोर आणले. त्यासाठी आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर ते स्वतः गेले. गुंतवणूक नेहमी स्पर्धात्मक राज्यांकडे जाते. त्यामुळे पायाभूत सुविधा, धोरणातील सातत्य, डिजिटल प्रशासन, जलद निर्णय आणि जागतिक दर्जाचे शहरीकरण ही त्यांच्या विकासदृष्टीची अपरिहार्य अंगे बनली. महाराष्ट्राबद्दल आकर्षण निर्माण झाले. पूर्वीच्या काळात महाराष्ट्राचा विकास अजीबात झाला नाही, असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरेल. मात्र, फडणवीसांच्या पहिल्या कार्यकाळात आणि सध्याच्या कार्यकाळात तो जसा झाला किंवा होतोय, त्याची तुलना भूतकाळाशी होऊ शकत नाही हेही तेवढेच खरे आहे. याचे कारण भविष्याचा वेध घेण्याच्या फडणवीसांच्या कार्यशैलीत दडलेले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात आतापर्यंत अनेक नेते सत्तेचे शिल्पकार झाले. पण खऱ्या विकासाचे शिल्पकार म्हणून ओळख मिळविण्याची संधी फार थोड्यांना मिळाली. त्यातील अव्वल नंबरचे नाव म्हणजे देवेंद्र फडणवीस. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी सर्वाधिक काळ कार्यरत असलेल्या नेत्यांच्या यादीत त्यांचे नाव अलिकडेच आलेले आहे. तो विक्रम त्यांच्या नावे नोंदविला गेला आहे. पुढच्या काळातही अनेक विक्रम फडणवीसांच्या नावे नोंदविले जातील. कारण त्यांनी महाराष्ट्राला दिलेली दिशा आणि त्यासाठी केलेले काम. आपल्या काळाच्या मर्यादा ओलांडून पुढच्या काळासाठी काहीतरी टिकाऊ निर्माण करणाऱ्यांचीच इतिहास नोंद घेत असतो. फडणवीसांची तशी नोंद इतिहासात झालेली आहे आणि त्यामुळेच त्यांना ‘विकासाचा धुरंधर’ असे संबोधन देताना आमच्या मनात अतीव आनंद आहे. या धुरंधराला जन्मदिनाच्या अनंत कोटी शुभेच्छा!