अमरावती,
navneet-rana : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस तसेच अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त अमरावती जिल्ह्यात २५ हजारांहून अधिक वृक्षांचे रोपण करण्याचा संकल्प भाजपा नेत्या तथा माजी खासदार नवनीत राणा यांनी केला. या अभियानाचा शुभारंभ बुधवारी, २२ जुलैला पवित्र हनुमान गढी येथील रामवाटिका परिसरात वृक्षारोपण करून करण्यात आला.
नवनीत राणा म्हणाल्या, वाढते प्रदूषण, बदलते हवामान आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने वृक्षारोपणाला जीवनाचा अविभाज्य भाग बनविण्याची गरज आहे. हा केवळ औपचारिक कार्यक्रम नसून पर्यावरण संवर्धनाचा जनआंदोलन स्वरूपाचा उपक्रम आहे. आगामी दहा दिवस संपूर्ण जिल्ह्यातील प्रत्येक तालुका, गाव, शाळा, महाविद्यालय तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालयांच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. प्रत्येक युवक, युवतीने आपल्या आई-वडिलांच्या आठवणीप्रित्यर्थ किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमादरम्यान आमदार रवी राणा, कमलताई गवई, राजेश मोरडिया, गौतमलाल महाराज, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, पोलिस आयुक्त राकेश ओला, पोलिस अधीक्षक निकेतन कदम, कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते, मुख्य वनसंरक्षक ज्योती बॅनर्जी, उपवनसंरक्षक सुमित कुमार, जिल्हा शल्यचिकित्सक विनोद पवार, महेंद्र इंगळे, ओम शांती संस्थेच्या सीता दीदी, कीर्ती जमदाडे, भाजपा शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे, डॉ. बेलसरे, डॉ. डगवार, डॉ. प्रफुल्ल कडू, शेखर भोयर, सुनील खराटे, संजय तिरथकर, सुनील राणा, कल्याणी तायडे, ऋषीकेश देशमुख, सुनील वऱ्हाडे, विनोद कलंत्री, दर्शना पाटील, युवा स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष प्रकाश साबळे, महिला जिल्हाध्यक्ष सोनाली नवले आदी उपस्थित होते.