सिक्कीममध्ये बोगदा दुर्घटनेत २५ कामगारांपैकी २० ठार!

    दिनांक :22-Jul-2026
Total Views |
गंगटोक,
Tunnel accident in Sikkim सिक्कीममधील नामची जिल्ह्यात सोमवारी, २० जुलै २०२६ रोजी घडलेल्या भीषण बोगदा दुर्घटनेत २० कामगारांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. बांधकाम सुरू असलेल्या बोगद्यात मिथेन वायूचा अचानक स्फोट झाल्यानंतर बोगद्याचा काही भाग कोसळला. या घटनेनंतर बचाव आणि शोधमोहीम सुरू असून, आत अडकलेल्या कामगारांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.नामचीचे पोलीस अधीक्षक सोनम डी. भुतिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुर्घटनेच्या वेळी बोगद्यात २५ कामगार अडकले होते. त्यापैकी २० जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. बचाव आणि शोध मोहिमेदरम्यान आतापर्यंत १२ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. यापैकी सात मृतदेहांची ओळख पटली असून, उर्वरित मृतदेहांची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू आहे. काही जण अद्याप अडकले असण्याची शक्यता असल्याने बचावकार्य सुरूच आहे.
 
 
Tunnel accident in Sikkim
 
एनएचपीसीच्या (NHPC) निवेदनानुसार, खडकांमध्ये साचलेल्या मिथेन वायूचा अचानक स्फोट झाल्याने ही दुर्घटना घडली. स्फोटानंतर बोगद्यात मोठ्या प्रमाणात धूर आणि विषारी वायू पसरल्याचे सांगण्यात आले आहे. दुर्घटनेमागील नेमकी कारणे शोधण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री प्रेम सिंह तामांग यांनी केली आहे.दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री प्रेम सिंह तामांग यांनी मृत कामगारांच्या कुटुंबीयांसाठी प्रत्येकी ४,००,००० रुपये, तर जखमी कामगारांसाठी प्रत्येकी ५०,००० रुपयांची नुकसान भरपाई जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मुख्यमंत्री तामांग यांच्याशी संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला आणि केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत देण्याचे आश्वासन दिले.पंतप्रधान मोदी यांनी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना २ लाख रुपये आणि जखमींना ५०,००० रुपयांची सानुग्रह मदत जाहीर केली आहे. दरम्यान, या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कामगारांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सिक्कीम विधानसभेत दोन मिनिटांचे मौन पाळण्यात आले. बोगदा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मार्च २०२५मध्ये तेलंगणामध्ये घडलेल्या अशाच एका दुर्घटनेचीही आठवण झाली आहे. त्या घटनेत कामगार बोगद्यात अडकले होते आणि त्यांना बाहेर काढण्यासाठी अनेक तास उत्खननाचे काम सुरू होते.