अमेरिकेचा इराणवरील सलग ११ व्या रात्री हल्ला

    दिनांक :22-Jul-2026
Total Views |
वॉशिंग्टन/तेहरान,
US attacks Iran अमेरिका आणि इराणमधील लष्करी संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. अमेरिकेने इराणविरोधातील आपली लष्करी कारवाई सलग अकराव्या रात्रीही सुरू ठेवली. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने (CENTCOM) दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईत इराणमधील अनेक महत्त्वाच्या लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले.अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने सांगितले की, इराणची लष्करी ऑपरेशन केंद्रे, सागरी लष्करी क्षमता, विमानांचे हँगर्स, ड्रोन साठवणूक केंद्रे आणि लष्करी रसद व्यवस्थेशी संबंधित पायाभूत सुविधा या हल्ल्यांच्या केंद्रस्थानी होत्या. २१ जुलै रोजी रात्री ८:१५ वाजता सलग अकरावी लष्करी कारवाई पूर्ण करण्यात आल्याचे सेंटकॉमने स्पष्ट केले.
 
 

dfg5756 
होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या व्यापारी जहाजांसाठी इराणकडून निर्माण होणारा धोका कमी करणे, हा या कारवाईमागील प्रमुख उद्देश असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. अमेरिकेच्या लष्कराच्या दाव्यानुसार, गेल्या तीन महिन्यांत इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या ३० हून अधिक व्यापारी जहाजांवर हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमुळे शेकडो नागरी खलाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला असून, महत्त्वाच्या सागरी मार्गावरील वाहतुकीवरही परिणाम झाल्याचा दावा सेंटकॉमने केला आहे.अमेरिकेने इराणच्या कारवायांवर टीका केली असली तरी, होर्मुझची सामुद्रधुनी व्यापारी वाहतुकीसाठी खुली असल्याचे सेंटकॉमने म्हटले आहे. मे महिन्याच्या सुरुवातीपासून अमेरिकी सैन्याने या सागरी मार्गातून सुमारे ९०० व्यापारी जहाजांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून दिल्याचा दावा करण्यात आला आहे. या जहाजांमधून अंदाजे ४५० दशलक्ष बॅरल कच्च्या तेलाची वाहतूक झाल्याचेही अमेरिकेने सांगितले आहे.
 
 
दरम्यान, इराणची सरकारी वृत्तवाहिनी आयआरआयबीने अमेरिकेच्या कारवाईनंतर देशातील विविध भागांत हवाई हल्ले झाल्याचे वृत्त दिले आहे. इलम प्रांतातील चावर आणि अब्दनान परिसरात हवाई हल्ले झाल्याचे वृत्त असून, अब्दनानचे राज्यपाल यांनी दिनारकोह भागाला लक्ष्य करण्यात आल्याची पुष्टी केली आहे.कुर्दिस्तान प्रांतातील बानेह शहराच्या बाहेरील भागातही हल्ला झाल्याचे आयआरआयबीने म्हटले आहे. या घटनेचे वर्णन इराणकडून ‘शत्रू हल्ला’ असे करण्यात आले आहे. हमादान प्रांतातील काबुदार अहंग काउंटीला अमेरिकेच्या कथित आक्रमक कारवायांमध्ये लक्ष्य करण्यात आल्याचा दावा तेथील अधिकाऱ्यांनी केला. याशिवाय, खुजेस्तान प्रांतातील महशहर आणि पूर्व अझरबैजान प्रांतातील तब्रीझ येथे स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचे वृत्त आहे. आग्नेय इराणमधील चाबहार परिसरातही अनेक स्फोट झाल्याचे सांगण्यात आले असून, काही काळ लढाऊ विमाने आकाशात दिसल्याची माहिती समोर आली आहे. खुजेस्तानच्या लेफ्टनंट गव्हर्नरच्या हवाल्याने आयआरआयबीने बेहबहान आणि ओमिदियेह शहरांच्या आसपासच्या भागांवरही क्षेपणास्त्र हल्ले झाल्याचे म्हटले आहे. अमेरिकेच्या सलग अकराव्या लष्करी कारवाईनंतर इराणमधील विविध भागांमध्ये झालेल्या या घटनांमुळे दोन्ही देशांमधील संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.