विदर्भाचा अनुशेष अद्याप भरून निघाला नाही : ड. वामनराव चटप

(नव्या पिढीला स्वतंत्र विदर्भ देण्यासाठी लढा, पत्रपरिषदेत ड. वामनराव चटप यांची माहिती)

    दिनांक :22-Jul-2026
Total Views |
गडचिरोली, 
vamanrao-chatap : विदर्भातील सिंचन, उद्योग, रोजगार, शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधांबाबतचा अनुशेष आजही कायम असून, विदर्भातील लाखो बेरोजगारांना रोजगाराच्या संधी मिळालेल्या नाहीत. औद्योगिक विकासाऐवजी प्रदूषणाचा मोठा भार विदर्भावर टाकण्यात आला आहे. त्यामुळे विदर्भाला न्याय मिळवून देण्यासाठी स्वतंत्र विदर्भ राज्याची चळवळ अधिक व्यापक करण्याचा निर्धार करण्यात आला असून, नव्या पिढीच्या हाती स्वतंत्र विदर्भ राज्य सुपूर्द करण्यासाठी हा लढा सुरू असल्याचे विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते तथा माजी आमदार ड. वामनराव चटप यांनी आज आयोजित पत्रपरिषदेत सांगीतले.
 
 
 
kjkl
 
 
 
यावेळी त्यांनी सांगितले की, ‘मिशन 2027’ अंतर्गत 31 डिसेंबर 2027 पूर्वी स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी राज्यभर जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत विदर्भातील 11 जिल्हे आणि 120 तालुक्यांमध्ये विदर्भ निर्माण जनसंकल्प मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. नागपूर येथे 9 ऑगस्ट रोजी दीक्षाभूमी ते संविधान चौक असा लाँगमार्च काढण्यात येणार असून, सप्टेंबरमध्ये अहेरी येथेही जनसंकल्प मेळावा घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
 
 
चटप म्हणाले की, विदर्भाच्या वाट्याचा सिंचन, उद्योग, सार्वजनिक आरोग्य, शिक्षण, रस्ते, ग्रामविकास आणि आदिवासी विकासाचा अनुशेष अद्याप भरून निघालेला नाही. त्यामुळे शेतकरी, बेरोजगार आणि सर्वसामान्य नागरिकांना त्याचा मोठा फटका बसत आहे. महाराष्ट्रात राहून विदर्भाचा विकास होणार नसल्याने स्वतंत्र विदर्भ हाच एकमेव पर्याय असल्याचा दावा त्यांनी केला.
 
पत्रकार परिषदेला गडचिरोली जिल्हा समन्वयक अरुण पाटील मुनघाटे, चंद्रशेखर भडांगे, प्रकाश ताकसांडे, राजेंद्रसिंग ठाकूर, रमेश गजबे, सुनील पोरेड्डीवार, अशोक पोरेड्डीवार आदी उपस्थित होते.