अनिल कांबळे,
नागपूर,
young-woman-raped : एकतर्फी प्रेमातून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी विशेष पोक्सो न्यायालयाने आरोपी युवकाला १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच विविध कलमांखाली एकूण ५८ हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश तथा विशेष पोक्सो न्यायालयाचे न्यायाधीश जे. सी. यादव यांनी हा निकाल दिला. या प्रकरणातील आरोपी राजेश चंद्रभानजी कोटरुंगे (३६, रा. जिजामाता नगर, खरबी, नागपूर) याच्याविरुद्ध शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सरकारी पक्षाच्या माहितीनुसार, आरोपी राजेश कोटरुंगे आणि १७ वर्षीय पीडित मुलगी मोनाली (काल्पनिक नाव) या दोघांची ओळख होती. त्यानंतर दोघांची मैत्री झाली. मात्र, राजेश हा मोनालीवर एकतर्फी प्रेम करीत होता. तो वारंवार तिला प्रेमाची मागणी करीत होता. मात्र, मोनाली त्याला प्रेमसंबंध ठेवण्यास नकार देत होती. ११ एप्रिल २०२१ रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजता बजरंग चौक, घाट रोड परिसरातून मोनाली पायी घरी जात होती. आरोपी राजेशने तिला अडवले. मोटारसायकलवर बसण्यास सांगितले. तिने नकार दिल्यानंतर राजेशने तिला धमकावत जबरदस्तीने दुचाकीवर बसविले. त्यानंतर कोराडी रोडने घेऊन गेला. जंगलात निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
मोनालीने त्याच्या तावडीतून सुटका केली आणि थेट शांतीनगर पोलिस ठाण्यात गेली. राजेशने बलात्कार केल्याची तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून शांतीनगर पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ (बलात्कार), ३६३ (अपहरण), ५०६ (धमकी) तसेच पोक्सो कायद्याच्या कलम ४ अंतर्गत गुन्हा नोंदवला. आरोपीला १२ एप्रिल २०२१ रोजी अटक करण्यात आली होती. खटल्यादरम्यान सादर करण्यात आलेले साक्षीपुरावे आणि अन्य पुरावे ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले. न्यायालयाने त्याला १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा आणि दंड ठोठावला. गुन्ह्याचे तत्कालीन तपासी अधिकारी पोलिस निरीक्षक अमोल तांबे यांनी दोषारोपपत्र न्यायालया सादर केले होते. सदर खटल्यात सरकारी वकील ॲड. शहाजहॉ फारूख शेख यांनी तर, आरोपीतर्फे ॲड. मिना हिवसे यांनी काम पाहिले.