अनिल कांबळे
नागपूर,
stock market scam यूट्यूबवरील शेअर बाजारातील मोठ्या नफ्याच्या जाहिरातीतील आमिषाला बळी पडून एका डॉक्टरची सायबर गुन्हेगारांनी ४६ लाख १६ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सायबर पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यासह संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार डॉ. मेश्राम हे एप्रिल २०२५ पासून एका वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत असून गेल्या चार वर्षांपासून शेअर बाजारात गुंतवणूक करत आहेत. मे २०२६ मध्ये त्यांना यूट्यूबवर शेअर बाजारातून भरघोस नफा मिळवून देण्याची जाहिरात दिसली. त्यानंतर हेमंत ओसवाल नाव सांगणाऱ्या व्यक्तीने व्हॉट्सअॅपद्वारे संपर्क साधून स्वतःला एका इक्विटी ब्रोकिंग कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे सांगितले आणि डॉक्टरांना एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले. या ग्रुपमध्ये निश्चिल जैन नावाची व्यक्ती नियमितपणे शेअर खरेदी-विक्रीचे सल्ले देत होती. तसेच सेबी नोंदणीचे कथित प्रमाणपत्र दाखवून विश्वास संपादन करण्यात आला. सुरुवातीला काही व्यवहारांमध्ये नफा झाल्याचे दाखविल्याने डॉक्टरचा विश्वास अधिक दृढ झाला. त्यानंतर हेमंत ओसवाल, निश्चिल जैन, सुभी अग्रवाल आणि इतर आरोपींनी अधिक गुंतवणूक करण्यासाठी डॉक्टरला प्रवृत्त केले. त्यांच्या सांगण्यावरून डॉक्टरांनी विविध बँक खात्यांमध्ये एकूण ४६.१६ लाख रुपये जमा केले. काही दिवसांनी आरोपींनी डॉक्टरच्या गुंतवणुकीवर १६.५२ कोटी रुपयांचा नफा झाल्याचा दावा केला. मात्र, डॉक्टरांनी ५० लाख रुपये काढण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना १६ लाख रुपयांचे प्रोसेसिंग शुल्क भरण्याची मागणी करण्यात आली. फसगत झाल्याचे लक्षात येताच डॉ. मेश्राम यांनी सायबर पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली.
संशयामुळे टळली आणखी फसवणूक
स्वतःचे पैसे काढण्यासाठी १६ लाखांची मागणी केल्यामुळे डॉ. मेश्राम यांना संशय आला. त्यामुळे त्यांनी १६ लाख रुपये न भरता सायबर पोलिस ठाण्यात तक्रार केली.सायबर पोलिसांनी हेमंत ओसवाल, निश्चिल जैन, सुभी अग्रवाल, संबंधित इक्विटी ब्रोकिंग कंपनीचे व्यवस्थापन आणि व्हॉट्सअॅप ग्रुपच्या संचालकांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून या आर्थिक फसवणुकीचा पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी नागरिकांना सोशल मीडियावरील किंवा यूट्यूबवरील मोठ्या परताव्याच्या आमिषाला बळी न पडण्याचे आणि कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी संबंधित संस्थेची सत्यता पडताळून पाहण्याचे आवाहन केले आहे.