छत्रपती संभाजीनगर
dog attack छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील कसायखेडा शेतवस्तीवर घडलेल्या हृदयद्रावक घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मोकाट आणि हिंस्र कुत्र्यांच्या कळपाने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात तीन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. सार्थक गजानन पाटील असे या दुर्दैवी बालकाचे नाव आहे.
सार्थक खेळता खेळता घराबाहेर आला होता. याच वेळी रस्त्यावरून जाणाऱ्या आठ मोकाट कुत्र्यांच्या कळपाने अचानक त्याच्यावर हल्ला केला. कुत्र्यांनी चिमुकल्याला अक्षरशः घेरून त्याच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.या घटनेतील सर्वात हृदयद्रावक बाब म्हणजे सार्थकची आई काही अंतरावरच घरात होती. संकटाच्या क्षणी चिमुकला आईला हाका मारत असावा, मात्र त्याची आई जन्मजात मूकबधिर असल्याने त्याचा आवाज तिच्यापर्यंत पोहोचू शकला नाही. त्यामुळे मदतीची हाक देऊनही त्या निष्पाप जीवाला वेळीच मदत मिळू शकली नाही.
सार्थकचे वडील गजानन पाटील हे जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील रहिवासी असून, रोजगाराच्या शोधात ते कुटुंबासह खुलताबाद येथे आले होते. ते एका पोल्ट्री फार्मवर मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. घटनेच्या वेळी ते कामावर होते.
काही वेळानंतर सार्थक दिसत नसल्याचे लक्षात आल्यानंतर गजानन पाटील बाहेर आले. त्यावेळी समोरचा दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. तीन वर्षांच्या मुलाचा छिन्नविछिन्न मृतदेह पाहून आई-वडिलांनी केलेला आक्रोश उपस्थितांचे काळीज पिळवटून टाकणारा होता.घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोहर पुंगळे आणि राकेश आव्हाड यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. मसिउद्दीन शेख यांच्या मदतीने मृतदेह रुग्णवाहिकेतून वेरूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश केरे यांनी शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला.
या घटनेमुळे परिसरात मोकाट dog attack कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, एका निष्पाप बालकाच्या मृत्यूने नागरिकांमध्ये संताप आणि दुःख व्यक्त केले जात आहे.