मुख्यमंत्री कार्यालयाकडून डॉ. चंदेल यांच्या निवेदनाची दखल

लोकप्रतिनिधींच्या हवाई सुरक्षेबाबत अभिप्राय मागविणार

    दिनांक :23-Jul-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
शेंबाळपिंपरी, 
ajit-chandel : मंत्री, लोकप्रतिनिधी व अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या हवाई प्रवासाची सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी लष्करी पृष्ठभूमी असलेल्या अनुभवी वैमानिकांची नियुक्ती करण्याबाबत भाजपा पुसद मंडळाध्यक्ष डॉ. अजित चंदेल यांच्या निवेदनाची मुख्यमंत्री कार्यालयाने दखल घेतली आहे.
 
 
y23July-Dr.-Ajit-Chandel
 
या प्रस्तावावर पुढील कार्यवाहीसाठी विषय सामान्य प्रशासन विभाग तसेच विमानचालन संचालनालयाकडे पाठविण्यात आला आहे. तसेच नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडूनही अभिप्राय मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
 
 
डॉ. चंदेल यांनी आपल्या निवेदनात, लोकप्रतिनिधी हे लाखो नागरिकांच्या आशा-आकांक्षांचे प्रतिनिधित्व करीत असतात. त्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य मिळावे, या उद्देशाने ही मागणी करण्यात आली असून ती कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून जनहिताच्या दृष्टीने करण्यात आल्याचे नमूद केले आहे.
 
 
लष्करी, वायुसेना पृष्ठभूमी असलेल्या वैमानिकांना आपत्कालीन परिस्थितीत तातडीने निर्णय घेण्याचे प्रशिक्षण, प्रतिकूल हवामानात उड्डाणाचा अनुभव, उच्च शिस्त व जोखमीच्या परिस्थितीत विमान हाताळण्याचे विशेष कौशल्य असल्याने मान्यवरांच्या हवाई प्रवासाची सुरक्षितता अधिक मजबूत होऊ शकते, असेही त्यांनी म्हटले आहे.
 
 
मुख्यमंत्री कार्यालयाने या मागणीची दखल घेत संबंधित विभागांकडे विषय पाठविल्याने या प्रस्तावाला प्रशासकीय स्तरावर महत्त्व प्राप्त झाले आहे. या विषयावर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या अभिप्रायानंतर पुढील निर्णय प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
 
 
ही केवळ एका निवेदनाची बाब नसून राज्य व देशातील लोकप्रतिनिधींच्या सुरक्षिततेसाठी एका सामान्य नागरिकाने केलेली जबाबदार व दूरदृष्टीपूर्ण मागणी असल्याचे डॉ. अजित चंदेल यांनी स्पष्ट केले.