तभा वृत्तसेवा
पुसद,
indranil-naik : कार्यकर्त्यांना जपणारे व दिलेला शब्द पाळणारे आगळे राजकारणी म्हणजे अजितदादा होय. पक्ष, व्यक्ती, असो अथवा राजकारण, समाजकारण प्रत्येक गोष्टीकडे अजित दादांचे बारकाईने लक्ष होते. अतिशय शिस्त, कणखर व प्रशासनावर धाक असणारे त्यांचे अजोड व्यक्तीमत्व होते. दादा म्हणजे कामांचा झंझावात. कार्यकर्त्यांवर प्रेम करणारे दादा कायम हृदयस्थानी राहतील. त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा संकल्प जयंतीदिनी करूया, असे मनोगत राज्यमंत्री इंद्रनिल नाईक यांनी व्यक्त केले. ते बुधवार, 22 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अग्रवाल मंगल कार्यालयात अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

कार्यक्रमात माजी आमदार निलय नाईक, सदबाराव मोहटे, जिल्हा काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अॅड. सचिन नाईक, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सदस्य अॅड. आशिष देशमुख, शिवसेनेचे नेते राजन मुखरे, कृषीभूषण दीपक आसेगावकर, राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाचे सरचिटणीस शरद मैंद, भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. आरती फुपाटे, नगर परिषद अध्यक्ष मोहिनी नाईक, माजी नप अध्यक्ष अनिता नाईक, डॉ. माधवी गुल्हाने, डॉ. आशा कदम, नप उपाध्यक्ष अर्चना जगताप उपस्थित होते.
अचाट कार्यक्षमता व प्रचंड निर्णय क्षमता असलेला अजित दादा दूरदृष्टीचा नेता होता, नेतृत्वाची ही पोकळी कधीही भरून निघणार नाही, असे मत सदबा मोहटे यांनी व्यक्त केले. अॅड. आशिष देशमुख यांनी अजितदादांचे परखड राजकारण अधोरेखित केले. अॅड. निलय नाईक यांनी ते दिलेला शब्द नेहमी पाळत, असे सांगितले. अॅड. सचिन नाईक यांनी शिस्तबद्ध आणि स्पष्ट व्यक्तिमत्व असलेला नेता गमावल्याने महाराष्ट्राची अपरिमित हानी झाली आहे, अशा भावना व्यक्त केल्या.
या कार्यक्रमाला बीजी राठोड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शेख कौसर, खरेदी विक्री संघाचे धनंजय डुबेवार, नगरसेवक जयश्री डुबेवार, नपचे बांधकाम सभापती अभिजीत पानपट्टे, विविध संस्थांचे पदाधिकारी, नपचे सभापती, नगरसेवक, पत्रकार, जनता शिक्षण प्रसारक मंडळ शाळा व महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष शेख इरफान व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन संजय चव्हाण यांनी केले. तर क्रांती पाटील यांनी आभार मानले.
नेत्र तपासणी व रक्तदान शिबिर
अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त जनसेवा सप्ताहांतर्गत नगर परिषद क्षेत्रातील नागरिकांची नेत्र तपासणी तसेच रक्तदान शिबिराचे उद्घाटन यावेळी राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते झाले. यावेळी नप अध्यक्ष मोहिनी नाईक व सभापती, नगरसेवक उपस्थित होते. या दोन्ही शिबिराचा लाभ नागरिकांनी घेतला.