पांडुरंगाचं बोलावणं आलं आणि पहिली वारी अनुभवली

अभिनेत्री अक्षया नाईकचा भावुक अनुभव

    दिनांक :23-Jul-2026
Total Views |
मुंबई
akshaya naik आषाढी वारीबद्दल मनात अनेक वर्षांपासून असलेली उत्सुकता अखेर यंदा पूर्ण झाल्याची भावना अभिनेत्री अक्षया नाईकने व्यक्त केली आहे. विठ्ठल माऊलीच्या आशीर्वादाने आयुष्यातील पहिली वारी अनुभवण्याची संधी मिळाल्याचे सांगत तिने या अविस्मरणीय प्रवासाचा अनुभव चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
 

akshaya naik shares emotional first pandharpur wari experience 
वारीच्या अनुभवाबद्दल बोलताना अक्षया म्हणाली, “वारीबद्दल कायम मनात एक उत्सुकता होती. कधीतरी आपणही इतर वारकरी मंडळींसोबत वारीचा अनुभव घेऊ शकू का, हा प्रश्न नेहमी मनात यायचा. यंदा अचानक का होईना, पण पांडुरंगाचं बोलावणं आलं आणि मला आयुष्यातील पहिली वारी अनुभवता आली.”
वारीत सहभागी झाल्यानंतर वारकऱ्यांमधील उत्साह आणि ऊर्जा जवळून अनुभवता आल्याचे सांगताना ती म्हणाली, “वारीत चालणारी मंडळी पाहून त्यांच्या अंगात एवढी ऊर्जा कशी येते, याचं उत्तर मला प्रत्यक्ष वारीत मिळालं. हा समृद्ध आणि संपन्न अनुभव शब्दांत मांडणं अशक्य आहे. ‘वारी ही अनुभवावी लागते’ असं जे म्हणतात, त्याचा प्रत्यय मला या प्रवासातून आला. टाळ-मृदुंगांचा गजर, हरिनामाचा अखंड जप आणि संपूर्ण वारीतील उत्साह हा शब्दांच्या पलीकडचा आहे.”वारीदरम्यान विठ्ठल-रुक्मिणीचे रूप मानल्या जाणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळाल्याचाही तिने विशेष उल्लेख केला. “वारीत जाऊन मला विठ्ठल-रुक्मिणी रूपी आलेल्या वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळाली आणि त्यामुळे माझी वारी खऱ्या अर्थाने सुफळ-संपूर्ण झाली,” असेही अक्षयाने सांगितले.गेल्या काही वर्षांत अनेक कलाकार आषाढी वारीत सहभागी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. प्रत्येकाच्या वाट्याला येणारी वारी वेगळी असली, तरी प्रत्येकासाठी ती अध्यात्म, सेवा आणि भक्तीचा अद्भुत अनुभव देणारी ठरते, यात शंका नाही.