अमरनाथ-वैष्णोदेवी यात्रा पाचव्या दिवशीही स्थगित

चार दिवसांत ३१ जणांचा मृत्यू

    दिनांक :23-Jul-2026
Total Views |
जम्मू,
amarnath vaishno devi pilgrimage जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून, नद्या आणि ओढ्यांना आलेल्या मोठ्या पुरामुळे प्रशासनाने नदीकाठच्या भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरुवात केली आहे. चिनाब नदी धोक्याच्या पातळीच्या वरून वाहत असून, तावी नदीसह अनेक जलस्रोत दुथडी भरून वाहत आहेत.
 
 
amarnath vaishno devi pilgrimage
 
मुसळधार पावसासोबतच भूस्खलन आणि दरडी कोसळण्याच्या घटनांमध्येही मोठी वाढ झाली आहे. रामबन जिल्ह्यात एका प्रवासी टेम्पोवर मोठी दरड कोसळल्याने एका दाम्पत्याचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले. सुंदरबनी परिसरातील अग्रिम चौकीवर तैनात असलेला पंजाबमधील जवानही भूस्खलनाच्या ढिगाऱ्याखाली अडकला. लष्कराने तातडीने बचावकार्य सुरू केले, मात्र जवानाचा जीव वाचवता आला नाही. बांदीपोरा येथे पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या एका मुलाचा मृतदेहही सापडला आहे.
या घटनांमुळे जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या चार दिवसांतील पावसाशी संबंधित मृतांचा आकडा ३१ वर पोहोचला आहे. सुंदरबनीच्या महादेव गॅप परिसरातील फॉरवर्ड पोस्टवर तैनात रायफलमन सुखप्रीत सिंग हे २१ आणि २२ जुलैच्या मध्यरात्री भूस्खलनात अडकले होते. लष्कराच्या जवानांनी त्यांना बाहेर काढण्यासाठी मोठे बचावकार्य केले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.
दरम्यान, राजौरी दौऱ्यावर असलेले जम्मू-काश्मीरचे उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी यांचा ताफाही जम्मू-राजौरी राष्ट्रीय महामार्गावरील भूस्खलनाच्या घटनेतून थोडक्यात बचावला. दुसरीकडे, जम्मू-पूंछ महामार्गावर सुरानकोटजवळ भूस्खलन झाल्यानंतर खासदार मियान अल्ताफ अहमद यांचे शासकीय वाहन चिखलात अडकले. त्यानंतर त्यांनी वाहन सोडून बाधित नागरिकांची भेट घेण्यासाठी पायी जाण्याचा निर्णय घेतला.
उधमपूर आणि रामबनदरम्यान अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्याने जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. डोंगराळ भागातील अनेक मार्गांवर दरडी आणि मातीचा ढिगारा आल्याने संपर्क व्यवस्था विस्कळीत झाली आहे. उधमपूर, डोडा, किश्तवार, रियासी आणि रामबन जिल्ह्यांमध्ये शेकडो जोडरस्ते बंद झाले आहेत.
मुसळधार पावसाचा परिणाम धार्मिक यात्रांवरही झाला आहे. श्री अमरनाथ यात्रा, माता वैष्णोदेवी यात्रा आणि शिवखोडी यात्रा सलग पाचव्या दिवशी स्थगित ठेवण्यात आली आहे.amarnath vaishno devi pilgrimage कटरा परिसरातील बॅटरी कार मार्गावरही भूस्खलन आणि दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे एशिया चौक ते बलानी चेकपोस्टदरम्यानचा मार्गही तात्पुरता बंद करण्यात आला आहे.
पावसामुळे कठुआ जिल्ह्यात वीज वितरण व्यवस्थेलाही मोठा फटका बसला आहे. तब्बल ५६ विजेचे खांब आणि १७ वीज ट्रान्सफॉर्मरचे नुकसान झाले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, गुरुवारी दुपारनंतर पावसाचा जोर कमी होऊन हवामानात काही प्रमाणात सुधारणा होण्याची शक्यता आहे. मात्र, डोंगराळ भागातील भूस्खलनाचा धोका कायम असल्याने प्रशासन आणि बचाव पथकांकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.