अण्णा हजारेंचे मौन आंदोलन

दडपशाही नव्हे, संवाद हवा’ असा सरकारला संदेश

    दिनांक :23-Jul-2026
Total Views |
अहिल्यानगर
anna hazare NEET पेपरफुटी प्रकरणावरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत विद्यार्थी आणि विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. विद्यार्थ्यांनी 20 जुलै रोजी केलेल्या आंदोलनावर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर या प्रकरणाची चर्चा आणखी तीव्र झाली आहे. दिल्लीत समाजसेवक सोनम वांगचुक उपोषणाला बसले असताना आता महाराष्ट्रात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
 

anna hazare starts silent protest over neet paper leak demands dialogue with government 
अण्णा हजारे यांनी अहिल्यानगर येथे NEET पेपरफुटी, बेरोजगारी आणि भरती प्रक्रियेतील प्रश्नांवर मौन आंदोलनाला सुरुवात केली आहे. अहिल्यानगरमधील वाडिया पार्क येथील गांधी स्मारकात त्यांनी या आंदोलनाला प्रारंभ केला. आंदोलनापूर्वी त्यांनी सरकारला स्पष्ट संदेश देत दडपशाहीऐवजी संवादाचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले.“दडपशाही नव्हे, तर संवाद हवा,” अशी भूमिका अण्णा हजारे यांनी बॅनरच्या माध्यमातून मांडली. सरकारने विद्यार्थ्यांशी आणि आंदोलकांशी संवाद साधून प्रश्न सोडवायला हवेत, अशी मागणी त्यांनी केली. लोकशाही व्यवस्थेत दडपशाहीऐवजी संवादाला महत्त्व दिले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी आंदोलनस्थळाला प्रतीकात्मक स्वरूपात ‘नगरचे जंतर-मंतर’ असे नाव देण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.आंदोलनाला सुरुवात करण्यापूर्वी अण्णा हजारे यांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि त्यानंतर मौन आंदोलन सुरू केले. या आंदोलनादरम्यान त्यांच्या डोळ्यांत अश्रू आल्याचेही पाहायला मिळाले. त्यामुळे त्यांच्या आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.आंदोलनापूर्वी अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून NEET पेपरफुटी, बेरोजगारी आणि भरती प्रक्रियेतील समस्यांबाबत चिंता व्यक्त केली होती. विद्यार्थ्यांचे आंदोलन हा केवळ कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न नसून लोकभावनेशी संबंधित विषय आहे, असे त्यांनी पत्रात नमूद केले.
विद्यार्थी आणि आंदोलकांशी सरकारने संवाद साधावा, तसेच लोकशाही मूल्यांचे पालन करावे, असे आवाहन अण्णा हजारे यांनी केले आहे. त्यांच्या या आंदोलनाकडे आता सत्ताधारी आणि विरोधकांसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.