५१ परवाने, १४५ शस्त्रे; मुख्तार टोळीचा मोठा कट?

    दिनांक :23-Jul-2026
Total Views |
गाझियापूर,
arms-license-scam-case : उत्तर प्रदेशातील गाझियापूर येथील समाजवादी पक्षाचे खासदार अफझल अन्सारी हे शस्त्रास्त्रांच्या परवान्यातील गंभीर गैरव्यवहार आणि फेरफार प्रकरणात अडचणीत सापडले आहेत. दिवंगत बाहुबली मुख्तार अन्सारीच्या टोळीशी आणि त्याच्या सहकाऱ्यांशी संबंधित ५१ शस्त्रास्त्र परवान्यांवर तब्बल १४५ हत्यारे खरेदी-विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार पोलिसांच्या तपासात उघडकीस आला आहे. याप्रकरणी गाझियापूर पोलिसांनी खासदार अफझल अन्सारी यांच्यासह तत्कालीन दोन शस्त्र लिपिकांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
 

up 
 
 
अभिलेख कक्षातून महत्त्वाची कागदपत्रे गायब
पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्तार अन्सारीच्या टोळीशी संबंधित सदस्यांच्या शस्त्रास्त्र परवान्यांची उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब आणि अरुणाचल प्रदेशमध्ये सखोल पाहणी व पडताळणी करण्यात आली. या तपासादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अभिलेख कक्षातून (रेकॉर्ड रूम) शस्त्रास्त्रांचे परवाने आणि त्यांच्या खरेदी-विक्रीशी संबंधित मूळ नस्त्या (फाईल्स) संशयास्पदरीत्या गायब असल्याचे समोर आले.
यामध्ये खासदार अफझल अन्सारी यांच्या नावावर असलेल्या परवान्याची कागदपत्रे देखील गायब आढळली. तसेच या परवान्यावर खरेदी केलेल्या विशिष्ट बंदुकीची (रायफल) माहिती आणि सद्यस्थितीही पोलिसांना मिळू शकलेली नाही.
गुन्हेगारी कारवायांसाठी शस्त्रांचा वापर?
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, तत्कालीन शस्त्र लिपिकांशी संगनमत करून आणि गुन्हेगारी कट रचून ही सर्व कागदपत्रे मुद्दाम गायब करण्यात आली होती. शस्त्रांचा बेकायदेशीरपणे वापर करणे आणि तपासादरम्यान पोलीस किंवा प्रशासनाच्या हाती कोणताही पुरावा लागू नये, या उद्देशानेच हा गैरव्यवहार करण्यात आल्याचा संशय आहे.
या संपूर्ण प्रकरणात तत्कालीन कर्मचाऱ्यांनी पदाचा गैरवापर केल्याचे स्पष्ट झाले असून, पोलिसांनी फसवणूक, गुन्हेगारी कट आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत कारवाई सुरू केली आहे. उर्वरित सर्व परवान्यांची व शस्त्रांची प्रत्यक्ष तपासणी अद्याप सुरू आहे.