मुंबई,
ban on assembly मुंबईतील कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी शहरात २३ जुलैपासून ६ ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. संभाव्य अनुचित घटना, मानवी जीवितास तसेच मालमत्तेला धोका निर्माण होऊ नये, यासाठी मुंबई पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे. या आदेशानुसार, २३ जुलै रोजी रात्री १२.०१ वाजल्यापासून ६ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत मुंबईत पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींनी बेकायदेशीरपणे एकत्र येण्यास मनाई असेल.
मुंबई पोलिस कायद्यातील विशेष अधिकारांचा वापर करून पोलीस उपायुक्त (अभियान) अकबर पठाण यांनी यासंदर्भातील आदेश जारी केला आहे. या कालावधीत परवानगीशिवाय सभा, संमेलने, मिरवणुका किंवा अन्य प्रकारचे जमाव आयोजित करता येणार नाहीत. अशा कार्यक्रमांमध्ये लाऊडस्पीकर, वाद्ये, बँड पथके आणि फटाके वापरण्यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत.
मात्र, दैनंदिन जीवन आणि नागरिकांच्या आवश्यक सामाजिक व्यवहारांवर परिणाम होऊ नये, यासाठी काही बाबींना या आदेशातून सूट देण्यात आली आहे. लग्नसमारंभ, कौटुंबिक कार्यक्रम, अंत्ययात्रा आणि अंत्यसंस्कारासाठी होणाऱ्या जमावाला या निर्बंधातून वगळण्यात आले आहे. तसेच कंपन्या, सहकारी संस्था आणि विविध संघटनांच्या नियमित तसेच कायदेशीर बैठका आणि सामाजिक कार्यक्रमांनाही परवानगी असेल.
शहरातील सांस्कृतिक आणि व्यावसायिक व्यवहार सुरळीत सुरू राहावेत, यासाठी चित्रपटगृहे, नाट्यगृहे आणि इतर करमणुकीच्या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमांना या आदेशातून सूट देण्यात आली आहे.ban on assembly शासकीय आणि निमशासकीय कार्यालये, न्यायालये तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांचे नियमित कामकाजही या निर्बंधांच्या कक्षेत येणार नाही.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी शाळा आणि महाविद्यालयांमधील नियमित वर्ग सुरू राहतील. कारखाने, दुकाने आणि व्यापारी आस्थापनांमधील दैनंदिन कामकाज आणि त्यासाठी होणारी नियमित गर्दी यावरही या आदेशाचा परिणाम होणार नाही.
याशिवाय, स्थानिक पोलीस उपायुक्त किंवा सक्षम अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेतलेल्या सभा आणि मिरवणुकांनाही नियमांनुसार सवलत दिली जाऊ शकते. शहरातील संभाव्य धोके लक्षात घेऊन हा प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला असून, नागरिकांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.