'पेपरफुटी थांबवा, भविष्य वाचवा'

पेपरफुटीवर एल्गार

    दिनांक :23-Jul-2026
Total Views |
बंद आणि मोर्चाने शहर दणाणले...

भंडारा
bhandara students देशभर गाजत असलेल्या पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ भंडारा शहरात गुरुवारी विद्यार्थी, युवक आणि विविध सामाजिक- राजकीय संघटनांनी रस्त्यावर उतरून केंद्र सरकार विरोधात तीव्र संताप व्यक्त केला. दसरा मैदानातून निघालेला निषेध मोर्चा शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. हातात फलक, तोंडी घोषणाबाजी आणि शिक्षण व्यवस्थेतील अनागोंदी विरोधातील रोष अशा वातावरणात निघालेल्या या मोर्चाने शहराचे लक्ष वेधून घेतले. यावेळी बंदही पाळण्यात आला.
 

bhandara students protest against paper leak demand action and education minister resignation 
आंदोलनकर्त्यांनी नीट परीक्षेतील गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली, तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचीही मागणी लावून धरली. मोर्चा सुरू होण्यापूर्वीच शहरात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दुपारच्या सुमारास मोर्चाला प्रारंभ झाल्यानंतर गांधी चौकासह प्रमुख मार्गांवर घोषणांनी परिसर दणाणून गेला. केंद्र सरकारच्या शिक्षण धोरणांवर टीका करत विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना पाठीशी घालू नये, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली. यावेळी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामाची मागणी करण्यात आली. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचल्यानंतर त्याचे सभेत रूपांतर करण्यात आले. विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी यावेळी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर भाष्य करत परीक्षापद्धती अधिक पारदर्शक करण्याची गरज अधोरेखित केली.
दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील काही व्यापाऱ्यांनी मोर्चा मार्गावरील दुकाने काही काळ स्वयंस्फूर्तीने बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. मोर्चा पुढे सरकल्यानंतर बाजारपेठ पुन्हा पूर्ववत सुरू झाली. त्यामुळे शहरातील जनजीवनावर मोठा परिणाम झाला नसला तरी आंदोलनामुळे काही काळ वाहतुकीची गती मंदावली होती. शहरातील काही शाळांना वेळेपूर्वीच सुट्टी देण्यात आली. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिस प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली होती. मोर्चाच्या संपूर्ण मार्गावर विविध चौकांमध्ये पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अतिरिक्त पोलिस पथके, अग्निशमन दलाचे वाहन तसेच रुग्णवाहिकाही सज्ज ठेवण्यात आल्या होत्या.
आंदोलनाच्या शेवटी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. देशातील परीक्षापद्धती अधिक विश्वासार्ह करणे, पेपरफुटीच्या घटनांवर कायमस्वरूपी लगाम घालणे, दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करणे आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी होणारा अन्याय थांबवण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात अशा प्रमुख मागण्या निवेदनातून करण्यात आल्या.
...