मुंबई
bhootam bhayam पहिल्याच झलक, ट्रेलर आणि गाण्यांमधून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करण्यात झी स्टुडिओज प्रस्तुत आणि कायरा कुमार क्रिएशन्स निर्मित आगामी हॉरर-कॉमेडी चित्रपट ‘भूतम भयम्’ यशस्वी ठरला आहे. प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाला प्रेक्षकांकडून मिळालेला उत्स्फूर्त आणि सकारात्मक प्रतिसाद आता चाहत्यांच्या वाढत्या प्रेमात रूपांतरित झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
या प्रतिसादाची दखल घेत ‘ऑरेंज ज्यूस गँग’ने चाहत्यांसाठी खास एक्सक्लुझिव्ह फॅन स्क्रीनिंगची घोषणा केली. चित्रपट अधिकृतरीत्या प्रदर्शित होण्यापूर्वीच तो मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी मिळणार असल्याची माहिती समोर येताच चाहत्यांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सोशल मीडियावर घोषणा होताच गुगल फॉर्मच्या माध्यमातून हजारो जणांनी नोंदणी केली. त्यामुळे ‘भूतम भयम्’बद्दल प्रेक्षकांमध्ये निर्माण झालेली उत्सुकता आणि चित्रपटावरील विश्वास अधोरेखित झाला.
फॅन स्क्रीनिंगसोबतच निवडक इन्फ्लुएन्सर्ससाठीही विशेष स्क्रीनिंगचे आयोजन करण्यात आले होते. या स्क्रीनिंगनंतर सोशल मीडियावर चित्रपटाचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होत असून कलाकारांचा अभिनय, भव्य सेट्स, प्रभावी मेकअप, पार्श्वसंगीत आणि गाणी या सर्वच बाबींना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखा लक्षात राहणारी असल्याच्या प्रतिक्रिया उमटत असून, विशेषतः छाया कदम यांचा रहस्यमय आणि भयावह लूक सर्वांचेच लक्ष वेधून घेत असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.
प्रदर्शनापूर्वीच चाहते आणि इन्फ्लुएन्सर्सकडून मिळालेल्या या सकारात्मक प्रतिसादामुळे ‘भूतम भयम्’भोवती अनुकूल वातावरण निर्माण झाले असून, त्याचे प्रतिबिंब चित्रपटगृहांतील प्रतिसादातही पाहायला मिळेल, अशी चिन्हे आहेत. हॉरर आणि कॉमेडीचा भन्नाट संगम असलेला हा चित्रपट आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, वेगळा सिनेमॅटिक अनुभव देण्यासाठी सज्ज झाला आहे.
रामचंद्र अरुण गांवकर लिखित व दिग्दर्शित ‘भूतम भयम्’ या चित्रपटाची निर्मिती नरेन कुमार आणि महेश ज्ञानदेव कोरडे यांनी केली आहे. चित्रपटात करण सोनावणे, निनाद लिमये, नील साळेकर, सौरभ घाडगे, सिद्धांत सरफरे, शुभम जाधव, पुष्कराज चिरपुटकर, मनमीत पेम, प्रताप फड आणि छाया कदम यांच्या प्रमुख भूमिका आहेत.