गोंदिया जिल्ह्यातील 45 हजार बालके घेणार ‘व्हेज पुलाव’ची चव

- अंगणवाडीतील ‘घरपोच पोषण आहार’ योजनेत बदल - नोव्हेंबर महिन्यापासून अंमलबजावणी

    दिनांक :23-Jul-2026
Total Views |
गोंदिया, 
children-in-gondia : लहान मुलांची जेवणातील नखरे, गरोदर महिला व स्तनदा मातांची पोषणाची गरज लक्षात घेऊन राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाने अंगणवाडीतील ‘घरपोच पोषण आहार’ योजनेत मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या नोव्हेंबर आणि डिसेंबर पासून अंगणवाडीतील बालके, गरोदर महिला, स्तनदा माता आणि किशोरवयीन मुलींच्या ताटात अधिक चवदार आणि पौष्टिक आहार पाहायला मिळणार आहे. दरम्यान, जिल्ह्यातील 1 हजार 902 अंगणवाडी केंद्रातील जवळपास 45 हजार बालकांना आता स्वादिष्ट आणि पौष्टिक आहार म्हणून ‘व्हेज पुलाव’ ची चव घेता येणार आहे.
 
 
 
children-in-gondia
 
 
 
एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाड्यांमार्फत हजारो बालके आणि मातांना घरपोच पोषण आहार दिला जातो. मात्र, अनेकदा एकाच प्रकारच्या आहारामुळे तो खाण्याबाबत अनास्था दिसून येत असते. महिला व बालविकास विभागाच्या अधिकृत निर्देशांनुसार, लाभार्थ्यांना केवळ कॅलरीज किंवा पोषण देणे एवढाच उद्देश नसून, तो आहार त्यांनी आवडीने आणि आवडीच्या चवीने खावा, या हेतूने सुधारित मेनू तयार करण्यात आले आहे. आहार अधिक रुचकर आणि स्वीकारार्ह व्हावा, यासाठी महिला व बालविकास विभागाने पाककृतींमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहे.
 
 
पूर्वी दिल्या जाणार्‍या पौष्टिक तूरडाळ खिचडी प्रीमिक्ससह आता स्वादिष्ट ‘व्हेज पुलाव’ उपलब्ध करून दिला जाणार आहे. विशेष म्हणजे, यासाठी स्वतंत्र मसाल्याचे पाकीट दिले जाणार असून प्रत्येकाला आपल्या आवडीनुसार चवदार खिचडी बनवता येणार आहे. त्यातच भरड धान्ययुक्त बहुधान्य-प्रथिन मिश्रणाऐवजी आता लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा ‘बहुधान्य पौष्टिक पफ’ देण्यात येणार आहे. पौष्टिक बहुधान्य-प्रथिन मिश्रण ही पाककृती पूर्ववत आणि कायम असणार आहे. या नव्या आणि चवदार बदलांमुळे कुपोषणाविरुद्धच्या लढ्याला अधिक बळ मिळेलच, शिवाय बालकांचे आरोग्य सुधारण्यास आणि गरोदर स्तनदा मातांना योग्य पोषण मिळण्यास मोठी मदत होणार आहे.
 
 
जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्यांमध्ये या सुधारित मेन्यूनुसार पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू झाली आहे. नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यापासून या नव्या मेनूची प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.
- किर्तीकुमार कटरे
महिला व बाल विकास अधिकारी, जि.प. गोंदिया