दिल्ली वार्तापत्र
congress Protest नीट परीक्षेतील गैरव्यवहार आणि आंदाेलक विद्यार्थ्यांवर पाेलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ राजधानी दिल्लीत एकाच वेळी दाेन आघाड्यांवर आंदाेलन सुरू आहे. आंदाेलनाची पहिली आघाडी ही जंतरमंतरची आहे. याठिकाणी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी अभिजित दीपके यांच्या नेतृत्वातील काॅक्राेच जनता पार्टीतर्फे तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळापासून आंदाेलन सुरू आहे. आंदाेलनाची दुसरी आघाडी मंगळवारी काँग्रेसने उघडली.
लडाखमधील पर्यावरणवादी कार्यकर्ते साेनम वांगचूक जंतरमंतरवरील आंदाेलनात उतरल्यानंतर आणि त्यांनी बेमुदत उपाेषण सुरू केल्यानंतर आंदाेलनाचे गांभीर्य काही प्रमाणात वाढले. सुरुवातीला काँग्रेस आणि अन्य विराेधी पक्षांनीही या आंदाेलनाची पाहिजे तशी दखल घेतली नाही. एकप्रकारे उपेक्षाच केली. मात्र, बेमुदत उपाेषणाचे तीन आठवडे उलटून गेल्यानंतर वांगचूक यांची प्रकृती खालावू लागली, त्यामुळे दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाने आणि वैद्यकीय सल्ल्याने पाेलिसांनी वांगचूक यांना सफदरजंग रुग्णालयात हलवले. मानवीय भूमिकेतून पाेलिसांची ही कारवाई याेग्य अशीच म्हणावी लागेल. पण स्वत:ला वांगचूक यांचे हितचिंतक म्हणवणाऱ्या पण प्रत्यक्षात त्यांचे हितचिंतक नसणाऱ्या राजकीय पक्षांच्या लाेकांनी आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पाेलिसांच्या या कारवाईवर आक्षेप घेतला. बळाचा वापर करत पाेलिसांनी वांगचूक यांना रुग्णालयात दाखल केले, असा या लाेकांचा आराेप हाेता. उपाेषण करताना वांगचूक यांनी आपले प्राण गमवावे, असे तर त्यांच्या कथित समर्थकांना अपेक्षित नव्हते, असा प्रश्न यातून पडताे.
साेनम वांगचूक यांना रुग्णालयात हलवल्यानंतर त्यांच्या जागेवर काॅक्राेच जनता पार्टीचे नेते अभिजित दीपके उपाेषणाला बसले. पण बेमुदत उपाेषण करणे हे रस्त्यावर उतरून आंदाेलन करण्याइतके साेप नसल्याचे त्यांच्या लक्षात आले, त्यामुळे अडीच दिवसातच त्यांनी आपले उपाेषण गुंडाळले. राहुल गांधी यांना दुसऱ्या काेणत्याही शत्रूची गरज नाही, तेच स्वत:चे सर्वांत माेठे शत्रू असल्याचे विधान अभिजित दीपके यांनी केले हाेते.
दीपके यांच्या या विधानामुळे राहुल गांधी आणि काँग्रेस कार्यकर्ते नाराज झाले आणि त्यांनी या आंदाेलनापासून स्वत:ला दूर ठेवण्याचा निर्णय घेतला. आंदाेलनाला काँग्रेसने पाठिंबा देण्याचा तर प्रश्नच नव्हता. त्यामुळेच साेनम वांगचूक बेमुदत उपाेषणाला बसले असतानाही राहुल गांधी त्यांना भेटायला गेले नाहीत. एका जुन्या घटनेचा व्हिडीओ समाेर आल्यानंतर साेनिया गांधींच्या पुढाकारानंतर काँग्रेसने पवन खेरा यांना जंतरमंतरवर साेनम वांगचूक यांच्या भेटीसाठी पाठवले.
साेनम वांगचूक यांचे वडील साेनम वांगयाल यांनी १९८२ मध्ये लडाखमध्ये काही मागण्यांसाठी उपाेषण केले हाेते. उपाेषणामुळे वांगयाल यांची प्रकृती बिघडल्यामुळे तेव्हा पंतप्रधान असलेल्या इंदिरा गांधी यांनी लडाखला जात त्यांचे उपाेषण साेडवले हाेते. त्यामुळे नाईलाजाने काँग्रेसला जंतरमंतरवर जात साेनम वांगचूक यांची भेट घ्यावी लागली आणि आंदाेलनाला पाठिंबा द्यावा लागला.
मुळात काँग्रेस अभिजित दीपके यांच्याकडे राहुल गांधींचा मुख्य राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून पाहू लागली हाेती, असे वाटते. अभिजित दीपके जेवढे माेठे हाेतील, तेवढे राजकारणातील राहुल गांधींच्या स्थानाला धक्का बसेल, असे काँग्रेसला वाटू लागले. त्यामुळे या मुद्यावर नेमकी काेणती भूमिका घ्यावी, हे काँग्रेस नेत्यांना समजत नव्हते.
साेमवारी आंदाेलक विद्यार्थ्यांच्या संसद मार्चला जाे प्रतिसाद मिळाला, ताे पाहून काँग्रेस नेत्यांच्या ताेंडचे पाणी पळाले. साेमवारी दिवसभर देशातील सर्व माध्यमात अभिजित दीपके आणि त्यांच्या आंदाेलनाची चर्चा हाेती. माध्यमांचा पूर्ण फाेकस दीपके आणि त्यांच्या आंदाेलकांकडे वळला हाेता. देशातील तरुण अभिजित दीपकेच्या पाठीमागे जात असतील तर राहुल गांधींचे काय, असा प्रश्न काँग्रेसला पडू लागला.congress Protest यातूनच तरुणांचे हे आंदाेलन हायजॅक करण्याचा विचार काँग्रेस नेत्यांच्या मनात आला. त्यातूनच ७ लाेककल्याण मार्ग या पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या निवासस्थानासमाेर धरणे देण्याची कल्पना पुढे आली.
या याेजनेचा सुगावा दिल्ली पाेलिस आणि गुप्तचर संस्थांना लागला नाही, ही वस्तुस्थिती हाेती. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यसभेतील विराेधी पक्षनेते मल्लिकार्जुन खडगे, लाेकसभेतील विराेधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियांका वढेरा, वेणुगाेपाल, काँग्रेसचे खासदार आणि अन्य नेते माेर्चाने ७ लाेककल्याण मार्ग या पंतप्रधानांच्या निवासस्थानासमाेर पाेहाचले आणि त्यांनी धरणे आंदाेलन सुरू केले.
पंतप्रधानांच्या निवासस्थानाचा परिसर हा अतिसंवेदनशील भाग असताे. त्याठिकाणी काेणत्याही प्रकारचे आंदाेलन करू नये, हा संकेत आहे. तुम्हाला आंदाेलनच करायचे असेल तर दिल्लीत अनेक ठिकाणी करता येते. जंतरमंतर तर आंदाेलनासाठी राखीव क्षेत्र आहे. संसद भवन परिसरातही तुम्ही धरण्यावर बसू शकता. काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांपासून पंतप्रधानांच्या जिवाला धाेका पाेहाेचण्याची शक्यता नव्हती, पण या आंदाेलनात काही असामाजिक तत्त्व घुसले असते, तर काेणता अनुचित प्रसंग घडला असता, याची कल्पना करता येत नाही. अगदी आंदाेलकांना पांगवण्यासाठी पाेलिसांना लाठीहल्ला करावा लागला असता, अश्रुधुराच्या नळकांड्या फाेडाव्या लागल्या असता, तर काय अनवस्था प्रसंग ओढवला असता, याची कल्पनाही करवत नाही.
भाजपा विराेधी पक्षात असताना त्याने सरकारविरुद्ध अनेक आंदाेलने केली, पण पंतप्रधानांच्या निवासस्थानासमाेर कधीही आंदाेलन केले नाही. जे पथ्य आणि संकेत विराेधी पक्षात असताना भाजपा पाळत हाेती, तेच पथ्य आणि संकेत काँग्रेसनेही पाळले पाहिजे. राहुल गांधी नादान असतील, पण साेनिया गांधी आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे यांनी हे भान ठेवायला पाहिजे हाेते. खडगे राजकारणातील सर्वात ज्येष्ठ, संयमी आणि अनुभवी नेते आहे, त्यांनाही याचे भान राहिले नाही आणि ते राहुल गांधींमागे फरफटत गेले, याचे आश्चर्य वाटते.
राहुल गांधी ५६ वर्षाचे झाले तरी अजूनपर्यंत स्वत:ला युवा समजतात, त्यामुळे त्यांच्या वागण्यातही अनेकदा बालिशपणा दिसून येताे. पण खडगे तुम्हीसुद्धा.. असे म्हणावे वाटते. माेदी सरकार आणि दिल्ली पाेलिसांनी संयमाने परिस्थिती हाताळली म्हणून बरे झाले. सरकारने राहुल गांधींशी चर्चा करण्यासाठी, त्यांना समजवण्यासाठी केंद्रीय मंत्री डाॅ. जितेंद्रसिंह यांना पाठवले, पण राहुल गांधी ऐकायला तयार नव्हते. राजकीय नेत्यांनी आपल्या शब्दावर कायम राहायला पाहिजे, संसदेत विद्यार्थ्यांच्या मुद्यावर चर्चा घडवावी, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली. गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा करून सरकार संसदेत चर्चा करायला तयार असल्याचे आश्वासन डाॅ. जितेंद्रसिंह यांनी त्यांना दिले. सरकारच्या या आश्वासनानंतर राहुल गांधी यांनी आपले धरणे आंदाेलन मागे घ्यायला पाहिजे हाेते, पण त्यांनी तसे केले नाही. देशातील जनतेचा राहुल गांधींवर विश्वास नाही, याचे कारण हेच आहे. तुम्ही सरकारसमाेर एक मागणी ठेवली आणि सरकारने तुमची मागणी मान्य केली तर तुम्ही आपले आंदाेलन मागे घ्यायला पाहिजे हाेते, राजकीय शहाणपणा यातच असताे. पण राजकीय शहाणपणा आणि राहुल गांधी यांचा दूरदूरपर्यंत काही संबंध आहे, असे मंगळवारच्या घटनेवरून तरी वाटले नाही.
पंतप्रधानांच्या निवासस्थानासमाेर धरणे आंदाेलन करून राहुल गांधी यांनी देशातील कॅमेऱ्यांचा झाेत काही तासासाठी स्वत:कडे वळवत प्रसिद्धी मिळवली असली, तरी यातून त्यांनी आपले कायमस्वरूपी नुकसान करून घेतले आहे. अराजकतावादी नेता असे त्यांना म्हटले जात हाेते, पण मंगळवारच्या घटनाक्रमाने त्यांनी स्वत:च यावर शिक्कामाेर्तब करून घेतले. ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ यापेक्षा यावर आपण जास्त तरी काय म्हणणार?
श्यामकांत जहागीरदार
९८८१७१७८१७