इराणचा ‘डबल अटॅक’; अमेरिका हादरला?

    दिनांक :23-Jul-2026
Total Views |
तेहरान / वॉशिंग्टन,
fierce-counter-attack : पश्चिम आशियातील लष्करी तणाव अत्यंत तीव्र झाला असून, इराणने कुवेत आणि जॉर्डनमध्ये असलेल्या अमेरिकेच्या प्रमुख लष्करी तळांवर जोरदार प्रतिहल्ले केल्याचा मोठा दावा केला आहे. इराणच्या 'इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स' (आयआरजीसी) आणि इराणी सैन्याने गुरुवारी ही कारवाई केली. अमेरिकेकडून इराणवर सातत्याने होत असलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून ही लष्करी कारवाई करण्यात आल्याचे इराणने स्पष्ट केले आहे.
 
 
fierce-counter-attack
 
 
 
कुवेत आणि जॉर्डनमधील तळांवर भीषण प्रतिहल्ला
 
इराणच्या अधिकृत प्रसारमाध्यमांनुसार, जॉर्डनमधील अमेरिकन तळांवर केलेल्या हल्ल्यात अमेरिकेची अत्याधुनिक 'थाड' (THAAD) क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणा, 'पॅट्रियट' क्षेपणास्त्र प्रणाली आणि 'सी-रॅम' रडार यंत्रणा उद्ध्वस्त करण्यात आली आहे. याशिवाय अमेरिकन लष्कराचे इंधन साठे, हेलिकॉप्टर दुरुस्ती केंद्र आणि इतर लष्करी साधनसामग्रीचे मोठे नुकसान झाले असल्याचे इराणने म्हटले आहे.
 
दुसरीकडे, इराणी सैन्याने 'ऑपरेशन लाईटनिंग'च्या २३ व्या टप्प्यांतर्गत कुवेतमधील 'दोहा बेस', 'अली अल सालेम बेस' आणि 'कॅम्प अरिफजान' या तीन प्रमुख अमेरिकन लष्करी तळांवर मानवरहित विमानांच्या (ड्रोन) साहाय्याने हल्ले चढवले. या हल्ल्यात दारूगोळा साठा, रसद डेपो आणि 'एमक्यू-९' ड्रोनचे हँगर नष्ट झाल्याचा दावा इराणने केला आहे.
 
कुवेत अन् जॉर्डनच्या नागरिकांना इराणचा संदेश
 
इराणने जॉर्डन आणि कुवेतच्या नागरिकांना संबोधित करताना स्पष्ट केले की, इराण त्यांच्या देशाच्या सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक अखंडतेचा पूर्ण आदर करतो. मात्र, त्यांच्या भूमीवर अमेरिकन लष्करी तळांची उपस्थितीच या देशांच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण करत आहे. इराणवर हल्ला करणाऱ्या आणि इराणी नागरिकांची हत्या करणाऱ्या शत्रूला तो जिथून हल्ला करेल तिथेच सडेतोड उत्तर देणे हा आमचा कायदेशीर, धार्मिक आणि तार्किक अधिकार आहे, असे इराणच्या लष्कराने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
 
अमेरिकेकडून सलग १२ व्या रात्री इराणवर लष्करी कारवाई
 
दुसऱ्या बाजूला, अमेरिकेच्या 'सेंट्रल कमांड'ने (सेंटकॉम) दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकन सैन्याने सलग १२ व्या रात्री इराणमधील विविध लष्करी ठिकाणांवर आणि नौदलाच्या तळांवर हल्ले सुरूच ठेवले आहेत. यामध्ये इराणची सागरी क्षमता, क्षेपणास्त्रे व ड्रोन साठवणूक केंद्रे, तसेच हवाई संरक्षण यंत्रणांना लक्ष्य करण्यात आले आहे. याशिवाय, अमेरिकेने इराणच्या नाकेबंदीसाठी सागरी मार्ग रोखण्यास सुरुवात केली असून, सध्या पश्चिम आशियात ५० हजारांहून अधिक अमेरिकन सैनिक तैनात आहेत.