पॅरिस,
heatwave-deaths : युरोपातील तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे फ्रान्समध्ये मोठी आरोग्य आणीबाणी निर्माण झाली आहे. जून आणि जुलै महिन्याच्या सुरुवातीला आलेल्या या ऐतिहासिक उष्णतेच्या लाटेदरम्यान नेहमीपेक्षा तब्बल ५,७०० हून अधिक अतिरिक्त मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती फ्रान्सच्या सार्वजनिक आरोग्य संस्थेने जाहीर केली आहे. वर्ष २००३ नंतर फ्रान्समध्ये उष्णतेमुळे झालेली ही सर्वाधिक मोठी जीवितहानी ठरली आहे.
४० अंशांहून अधिक तापमानाचा फटका
आरोग्य यंत्रणेच्या माहितीनुसार, १७ जून ते २ जुलै या कालावधीत प्रभावित प्रदेशांमध्ये २१,६७४ मृत्यूंची नोंद झाली. सामान्य परिस्थितीच्या तुलनेत हे प्रमाण ३६ टक्क्यांनी जास्त असून, सुमारे ५,७६४ मृत्यू थेट उष्णतेच्या लाटेच्या प्रभावामुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. २४ आणि २५ जून रोजी फ्रान्समध्ये तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या पार गेला होता.
पॅरिसमध्ये सर्वाधिक प्रभाव, वृद्धांना मोठा धोका
या उष्णतेच्या लाटेचा सर्वाधिक फटका राजधानी पॅरिस आणि आसपासच्या परिसराला बसला आहे, जिथे अनपेक्षित मृत्यूंचे प्रमाण ८० टक्क्यांनी वाढले. मृत पावलेल्यांमध्ये ६५ टक्क्यांहून अधिक व्यक्ती या ७५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या होत्या. जवळपास अर्ध्या बाधितांचा मृत्यू उपचारादरम्यान रुग्णालयांमध्ये झाला, तर उर्वरित वृद्धाश्रमात किंवा राहत्या घरी मृत पावले.
हवामान बदलांमुळे अशा प्रकारच्या अति-उष्णतेच्या लाटांचे प्रमाण आणि तीव्रता जगभरात झपाट्याने वाढत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.