गोंदिया,
dadalora-scheme-distribution : जिल्हा पोलिस दलाच्या दादालोरा एक खिडकी योजनेअंतर्गत समाजोपयोगी उपक्रमांना सातत्याने चालना दिली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून एओपी गोठणगाव व उपजीविका सामाजिक संस्था, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी व दुर्गम भागातील शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमांतर्गत एओपी गोठणगाव परिसरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केळवद व गोठणगाव येथील इयत्ता पहिली ते चौथीच्या एकूण 100 विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, सहा वह्या आणि कंपास बॉक्सचे वाटप करण्यात आले. तसेच दोन्ही शाळांना विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाप्रेम वाढावे या उद्देशाने व्हॉलीबॉल व फुटबॉलही प्रदान करण्यात आले.

जिल्हा पोलिस अधीक्षक गोरख भामरे व अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाला उपजीविका सामाजिक संस्थेचे अध्यक्ष धीरज गलगले, संस्थेचे पदाधिकारी, माऊली सेवा मित्र मंडळाचे अध्यक्ष सुहास खरे, केशोरी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक शुभम नवले, एसआरपीएफचे पोलिस उपनिरीक्षक अरविंद जाधव, तसेच शाळेचे शिक्षक बुधवंत, ठाकरे आणि ढाकोळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे नियोजन एओपी गोठणगावचे माजी प्रभारी पोलिस उपनिरीक्षक निळकंठ गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अंबुले, हवालदार भावते व थेर यांनी केले. या उपक्रमामुळे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत मिळाल्याने पालक व शिक्षकांनी पोलिस प्रशासन आणि उपजीविका सामाजिक संस्थेचे कौतुक केले.