पोंभुर्णा,
tiger attack गुरे चराईसाठी गावालगतच्या जंगलात गेलेल्या गुराख्यावर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना गुरुवार, 23 जुलै रोजी सातारा भोसले क्षेत्रातील वन विकास महामंडळाच्या कक्ष क्रमांक 441 मध्ये घडली. ऊष्टु पोरेते (55, रा. सातारा भोसले, ता. पोंभुर्णा) असे मृतक गुराख्याचे नाव आहे.
ऊष्टु पोरेते हे गुरुवारी आपल्या एका सोबत्यासह नेहमीप्रमाणे गुरे चराईसाठी सातारा भोसले क्षेत्रातील वन विकास महामंडळाच्या कक्ष क्रमांक 441 मध्ये गेले होते. गुरे चरत असताना अचानक वाघ त्यांच्या समोर आला. वाघाला बघून त्यांच्या सोबती पटकन झाडावर चढला. ऊष्टु पोरेते हे सुध्दा झाडावर चढण्यासाठी गेले असता वाघाने हल्ला करून त्यांना ठार केले. सोबत असणार्या व्यक्तीने भ्रमणध्वनीवरून घटनेची माहिती ग्रामस्थांना दिली. माहिती कळताच ग्रामस्थांना घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांना बघताच वाघाने पळ काढला. वनविकास महामंडळाच्या अधिकार्यांनी घटनास्थळी दाखल होत अधिक तपास सुरू केला. मृतकाच्या पश्चात पत्नी, 2 मुले असा आप्त परिवार आहे.