हुतींचा ‘डबल मिसाइल अटॅक’; सौदीचे तेल टँकर निशाण्यावर!

    दिनांक :23-Jul-2026
Total Views |
सना / रियाध,
houthi-red-sea-attack : पश्चिम आशियातील लष्करी तणाव दिवसेंदिवस अधिकच चिघळत चालला असून, यमनमधील हुथी बंडखोरांनी तांबड्या समुद्रात (रेड सी) सौदी अरेबियाच्या दोन मोठ्या इंधनवाहू जहाजांवर (ऑईल टँकर्स) यशस्वी प्रतिहल्ला केल्याचा मोठा दावा केला आहे. तांबड्या समुद्रातून प्रवास करणाऱ्या व्यापारी आणि इंधनवाहू जहाजांवर झालेल्या या ताज्या हल्ल्यामुळे आंतरराष्ट्रीय सागरी मार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
 
 
houthi-red-sea-attack
 
 
 
क्षेपणास्त्रे आणि मानवरहित विमानांचा (ड्रोन) वापर
 
हुथी बंडखोरांच्या लष्करी प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, 'अमजद' आणि 'अमजाद २४' या सौदी अरेबियाच्या दोन अवाढव्य इंधनवाहू जहाजांना लक्ष्य करून हा हल्ला चढवण्यात आला. या कारवाईत अनेक सागरी क्षेपणास्त्रे आणि मानवरहित विमानांचा (ड्रोन) वापर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ही दोन्ही जहाजे नियमांचे उल्लंघन करून इस्रायलशी संबंधित बंदरांकडे मार्गक्रमण करत होती, असा आरोप हुथी गटाने केला आहे.
 
सागरी मार्गावरील नाकेबंदी आणखी कडक करण्याचा इशारा
 
हुथी सैन्याने स्पष्ट केले आहे की, जोपर्यंत गाझा पट्टीवरील लष्करी कारवाया थांबवल्या जात नाहीत आणि तेथील नागरिकांवरील नाकेबंदी उठवली जात नाही, तोपर्यंत तांबड्या समुद्रातून इस्रायलकडे जाणाऱ्या किंवा इस्रायलशी संबंधित असलेल्या सर्व जहाजांवर असेच हल्ले सुरूच राहतील. इस्त्रायल आणि त्याच्या समर्थक देशांच्या सागरी जहाजांना या जलमार्गाचा वापर करू दिला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
 
जागतिक इंधन पुरवठ्यावर गंभीर परिणामांची शक्यता
 
या हल्ल्यानंतर तांबड्या समुद्रातील इंधन वाहतूक आणि सागरी व्यापार धोक्यात आला आहे. जगातील एक महत्त्वाचा व्यापार मार्ग मानल्या जाणाऱ्या या भागातून इंधनवाहू जहाजांच्या वाहतुकीवर सातत्याने होत असलेल्या हल्ल्यांमुळे कच्च्या तेलाच्या जागतिक किमतींवर आणि आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सौदी अरेबिया आणि आंतरराष्ट्रीय सागरी सुरक्षा दलांकडून या घटनेच्या पार्श्वभूमीवर विशेष सतर्कता बाळगली जात आहे.