गोल्डमध्ये गुंतवणुकीच्या नावावर ३६ लाखांनी फसवणूक

    दिनांक :23-Jul-2026
Total Views |
अनिल कांबळे,
नागपूर, 
gold-fraud : सोने-चांदीतील गुंतवणुकीवर भरघोस परतावा आणि मोठ्या बिल्डर्सशी व्यावसायिक ओळख करून देण्याचे आमिष दाखवत जरीपटका येथील बांधकाम साहित्य पुरवठादाराची ३६ लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी सायबर पोलिसांनी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
 
 
 
k
 
 
 
तक्रारदार शेख ताहिर जरीपटक्यात राहतात आणि बांधकाम साहित्य पुरवठ्याचा व्यवसाय करतात. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ एप्रिल २०२६ रोजी तक्रारदाराला एका अनोळखी क्रमांकावरून व्हॉट्सॲप कॉल आला. कॉल करणाऱ्याने स्वतःचे नाव पलाश सोनी असल्याचे सांगत, शहरातील नामांकित बिल्डर्सशी ओळख करून देऊन व्यवसाय वाढवून देण्याचे आश्वासन दिले. यानंतर झालेल्या संवादात आरोपीने तक्रारदाराला शेअर मार्केटमधील सोने व चांदी गुंतवणूक विभागात पैसे गुंतविल्यास मोठा नफा मिळेल, असे सांगून विश्वास संपादन केला.
 
 
तसेच गुंतवणुकीची रक्कम 'प्रीमियर ट्रेडिंग कंपनी'च्या बँक खात्यात जमा करण्यास सांगितले. आरोपीच्या आश्वासनांवर विश्वास ठेवून तक्रारदाराने दोन आरटीजीएस व्यवहारांद्वारे एकूण ३६ लाख रुपये संबंधित बँक खात्यात जमा केले. मात्र, गुंतवणुकीवर कोणताही परतावा मिळाला नाही. तसेच रक्कमही परत करण्यात आली नाही. वारंवार संपर्क करूनही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने नागपूर सायबर पोलिसांकडे धाव घेतली. सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी संदीप बागुल यांनी पलाश सोनी आणि त्याचा साथीदार चिनू यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३१८(४), ३१९(२), ३३६(३) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम ६६(डी) अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्याबरोबरच फसवणुकीची रक्कम कोणत्या खात्यांमध्ये वळविण्यात आली, याचा मागोवा सायबर पोलिसांकडून घेतला जात असून, पुढील तपास सुरू आहे.