वेध
विजय निचकवडे
digital loan apps सहज मिळत असेल आणि वारंवार एखाद्या गाेष्टीसाठी पिच्छा पुरविला जात असेल तर मानवी स्वभावच असा आहे की, ताे बळी पडताेच! मात्र, नंतर यातून वाट्याला येणारा मन:स्ताप वैताग आणणाराच नव्हे, तर का ही दुर्बुद्धी सुचली, अशा मानसिकतेत माणसाला नेणारा असताे. खाजगी फायनान्स कंपन्या, डिजिटल कर्ज देणारे ॲप्स यांच्याकडून सहज उपलब्ध हाेणारे कर्ज तेव्हा समाधान देणारे असते; मात्र नंतर हाेणारी ‘पठाणी’ वसुली अवघड जागेचे दुखणे म्हणूनच सहन करावे लागते. तेव्हा कळतं सहज मिळणाऱ्या गाेष्टीत समाधान नसतं म्हणून!
‘कर्ज’ हा प्रत्येक सामान्य माणसाच्या जगण्याचा आधार आहे. कर्ज काढून समाधानाने जगणारी अनेक कुटुंब आपण पाहताे. मात्र अशा कुटुंबांना आधी कर्ज घेताना कमालीच्या क्लिष्ट प्रक्रियेला सामाेरे जावे लागते. एक व्यवस्था या विरुद्धही आहे. जेथे अगदी सहज, काेणत्याही कागदपत्रांची फारशी खातरजमा न करता कर्ज उपलब्ध करून देण्याची साेय केली जाते आणि ते म्हणजे खाजगी फायनान्स कंपन्या व आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात तयार झालेले कर्ज देणारे डिजिटल ॲप्स! खरं तर नियम, कायद्याची बंधने सगळ्यांसाठीच आहेत. माेठमाेठाल्या बँकांनाही आणि खाजगी फायनान्स कंपन्यांनासुद्धा. पण ते पाळायचे की नाही, हा ज्याचा त्याचा विषय असल्याचेच चित्र सध्या आहे.
एरवी राष्ट्रीयकृत बँकेतून कर्ज घेताना जीव मेटाकुटीस येईल एवढी चाैकशी आणि कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागते; पण हा त्रास तेवढ्यापुरताच! नंतर मात्र सर्वकाही निवांत चालते. खाजगी फायनान्स कंपनीचे आणि डिजिटल ॲप्सचे जरा वेगळेच आहे. ते कर्ज घ्या म्हणून तुमचा एवढा पिच्छा पुरवितात की, जेवढं बाेलणं कुटुंबातील सदस्यांसाेबत हाेत नसेल, तेवढा संवाद कंपनीवाले आपल्याशी करतात. वेळ-काळाचे भान नाही. रात्री १० वाजो की ११ त्यांचे फाेन येणार! मॅसेज तर सांगूच नका... अतिरेक म्हणजे आपण काेणत्याही प्रकारचा कर्जासाठी ‘अर्ज’ केला नसेल तर ताे ‘अप्रुव्ह’ म्हणजेच मान्य झाल्याचे मॅसेज करून कंपन्या माेकळ्या हाेतात. अनेक नावाजलेल्या फायनान्स कंपन्यांही याच पद्धतीने वागतात. बरेचदा पाठपुराव्यासाठी दाखविल्या जाणाऱ्या सततच्या जाहिरातींना प्रभावित हाेऊन अनेक जण बळी पडतात आणि ‘कर्जबाजारी’ हाेतात.
आणि एकदा का आपण कर्ज घेतलं की, खाजगी कंपन्यांची भाषा आणि व्यवहार बदलतात. ही काेणत्याही एका नव्हे, तर सर्व कंपन्यांची रित आहे. कुणाचे सुख-दु:ख यांना कळत नाही की दिवस-रात्रीचे भान राहत नाही. सुटीचे आणि कामाच्या दिवसांचाही यांना विसर पडताे. त्यांना केवळ अगदी सहजतेने कर्ज म्हणून दिलेले पैसे ‘वसुली’ करण्याची धुंद चढलेली असते. त्यावेळी कळते अगदी सहज मिळालेल्या गाेष्टी चिरकाल समाधान देऊ शकत नाही, हे नक्की!
आज अशा खाजगी फायनान्स कंपन्यांचे जाळे प्रचंड वाढले आहे. सहज मिळणाऱ्या कर्जाच्या भानगडीत आम्ही स्वतःच स्वतःची फसवणूक करून घेत आहाेत. डिजिटल कर्ज ॲप्सच्या माध्यमातून युवा पिढी आपले लहान-माेठे खर्च भागविण्याच्या विचाराने याला बळी पडून नंतर प्रचंड मन:स्तापाचा बळी ठरताना दिसत आहेत.digital loan apps यातून डिजिटल गुन्हेगारीही वाढत चालली आहे. पठाणी वसुलीसाठी अगदी सर्व मर्यादा ओलांडण्याचे प्रकार डाेळ्यादेखत घडत असूनही यावर अंकुश कुणाचा हा प्रश्न कायम असेल तर मात्र क्षणिक समाधानात तथ्य काय, असाच प्रश्न पडताे.
नियम माेठ्या पतपेढ्यांना आहेत, तसेच याही संस्थांना आहेत. सकाळी ८ ते संध्याकाळी ७ पर्यंतच फाेन किंवा भेटून वसुलीसाठी संपर्क करावा, असे आहे. पूर्वसूचना देऊनच कर्जदाराकडे जाण्याचे निर्देश आहेत. धमक्या किंवा शिवीगाळ करून वसुली करू नये, अशा रिझर्व्ह बँकेच्या सूचना असतानाही त्या पाळल्या जात नाहीत, हे वास्तव आहे. कर्ज वसुलीसाठी घरावर आलेला फायनान्स कंपनीचा माणूस अनेकदा अपमानजक वागणूक देऊन जाताे. अशावेळी ते सुरुवातीचे क्षणिक समाधान नकाेसे वाटते. आज सहज कर्ज उपलब्ध हाेण्याच्या नादात आम्ही अशा कंपन्यांच्या ‘मार्केटिंग’ काैशल्याचे बळी ठरताे आणि समाधान गमावून बसताे. एकाला अनुभव येऊनही जर शेजारचा त्याच मार्गाने जाणार असेल तर सहज उपलब्ध हाेत असल्याने ते स्वीकारण्याची मानसिकता बदलावी लागणार आहे. नाहीतर हे रडगाणे न संपणारे असेच असेल!
९७६३७१३४१७