कारंजा लाड,
karanja municipal council येथील नगर परिषदेअंतर्गत घनकचरा व्यवस्थापन विभागात गेल्या १५ वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या घंटागाडी कामगारांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी २२ जुलै पासून बेमुदत संप पुकारला आहे. अनेक वेळा प्रशासनाचे लक्ष वेधूनही मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करत महाराष्ट्र कामगार विकास संघटनेच्या वतीने नगर परिषदेच्या मुख्याधिकार्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.
कामगारांचे म्हणणे आहे की, शहरातील स्वच्छता व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी ते अनेक वर्षांपासून प्रतिकूल परिस्थितीत काम करत आहेत. पाऊस, उन्हाळा किंवा थंडी अशा कोणत्याही ऋतूमध्ये नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावत असतानाही त्यांना शासनाने निश्चित केलेल्या किमान वेतनानुसार वेतन दिले जात नाही. अनेक महिन्यापासूनचे थकीत वेतनही अद्याप मिळालेले नसल्याने त्यांच्या कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवले आहे. कामगारांना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, कर्मचारी राज्य विमा योजना तसेच इतर कायदेशीर सुविधांचा लाभ मिळत नाही. याशिवाय कामाच्या स्वरूपानुसार आवश्यक असलेले हातमोजे, मास्क, बूट, रेनकोट आणि इतर सुरक्षा साहित्यही उपलब्ध करून दिले जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे कामगारांच्या आरोग्याचा आणि सुरक्षिततेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान, या प्रकरणात नगर परिषद प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. प्रशासनाकडून कामगारांच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढला जाणार की संपामुळे शहरातील स्वच्छता व्यवस्था ठप्प होणार, याकडे कारंजा शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. या संपामुळे शहरातील घनकचरा संकलन, कचरा वाहतूक आणि स्वच्छता व्यवस्था विस्कळीत होण्याची शयता आहे. त्यामुळे नागरिकांनाही मोठा त्रास सहन करावा लागू शकतो. संपामुळे शहरातील स्वच्छता सेवांवर होणार्या परिणामाची संपूर्ण जबाबदारी नगर परिषद प्रशासन आणि संबंधित कंत्राटदार यांच्यावर राहील.असा इशारा संघटनेने दिला आहे.