अनिल कांबळे,
नागपूर,
land-transactions-fraud : जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहारात मालकी हक्काबाबत चुकीची माहिती देऊन दिशाभूल करुन शहरातील एका तांदूळ व्यापाऱ्याची १ कोटी ६ लाख ५७ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी एकाच कुटुंबातील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. किशोर दामोदर बलाल, सुभाष दामोदर बलाल, गिरीश दामोदर बलाल आणि पराग किशोर बलाल अशी आरोपींची नावे आहेत.

तक्रारदार अनूप रामावतार गोयल (वय ५१) हे धरमपेठ येथील खरे टाऊनमधील अपार्टमेंटमध्ये राहतात आणि राईस मिलचा व्यवसाय करतात. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संबंधित जमीन सर्व प्रकारच्या कायदेशीर प्रक्रियेनंतर नियमित (रेग्युलराईज) झालेली असून संपूर्ण जमिनीचा निर्विवाद ताबा मिळेल, असे तक्रारदाराला सांगितले. हा व्यवहार १ डिसेंबर २०२३ या तारखेला झाला. त्यांच्या आश्वासनांवर विश्वास ठेवून अनूप गोयल यांनी २२ एप्रिल २०२४ रोजी संबंधित जमिनीचा नोंदणीकृत खरेदीखत केला. मात्र, व्यवहार पूर्ण झाल्यानंतर ८३.६१ चौरस मीटर जमीन ही आरक्षित (रिझर्व्ह) अथवा संवर्धन क्षेत्रातील असल्याचे समोर आले. या जमिनीवर आरोपींचा मालकी हक्क नसतानाही त्यांनी ती स्वतःची खासगी मालमत्ता असल्याचे भासवून विक्री व्यवहार केल्याचा आरोप आहे. या दिशाभूल करणाऱ्या व्यवहारामुळे तक्रारदाराचे १ कोटी ६ लाख ५७ हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तक्रारीनंतर सीताबर्डी पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. व्यवहाराशी संबंधित कागदपत्रांची पडताळणी, जमिनीच्या मालकी हक्काची नोंद तसेच आरोपींनी जाणूनबुजून चुकीची माहिती दिली होती का, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.