गोंदिया,
lethal-attack-on-senior-citizen : शहरातील रामनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सूर्याटोला येथील बांध तलाव परिसरात मॉर्निंग वॉकवरून परतणार्या 68 वर्षीय ज्येष्ठ नागरिकावर अज्ञात आरोपीने प्राणघातक हल्ला करून सोन्याचे दागिने लुटल्याची धक्कादायक घटना गुरुवारी 23 जुलै रोजी सकाळी घडली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सूर्याटोला परिसरातील रहिवासी प्रदीप अपाले (68) हे नेहमीप्रमाणे सकाळी सुमारे 7 वाजता बांध तलाव परिसरात मॉर्निंग वॉक करून घरी परतत होते. त्याचवेळी मागून आलेल्या एका अज्ञाताने त्यांच्यावर अचानक हल्ला चढविला. आरोपीने धारदार शस्त्राने त्यांच्या डोक्यावर सलग दोन वार करून त्यांना गंभीर जखमी केले. दरम्यान, जखमी अवस्थेत खाली कोसळलेल्या अपाले यांच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि हातातील सोन्याची अंगठी हिसकावून आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. परिसरातील नागरिकांच्या मदतीने त्यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती रामनगर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची मदत घेण्यात येत असतानाच विशेष पथक रवाना करण्यात आले आहे.
नागरिकांमध्ये दहशत...
बांध तलाव परिसर रामनगर पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असून या परिसरात सकाळी आणि सायंकाळी मॉर्निंग वॉकसाठी मोठ्या संख्येने नागरिक येत असतात. अशा सुरक्षित समजल्या जाणार्या ठिकाणी भरदिवसा झालेल्या या जीवघेण्या हल्ला व लुटीच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपीला तातडीने अटक करून परिसरात पोलिस गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.