अकोला
24 tiger deaths देशात वाघ संवर्धनात आघाडीवर असलेल्या महाराष्ट्रात यंदा वाघांच्या मृत्यूचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढले आहे. १ जानेवारी ते १९ जुलै २०२६ या कालावधीत राज्यात तब्बल २४ वाघांचा मृत्यू झाला असून, देशभरात नोंद झालेल्या ११० वाघांच्या मृत्यूंपैकी महाराष्ट्रातील मृत्यूंची संख्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. मध्य प्रदेशात सर्वाधिक ३८ वाघांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या (एनटीसीए) संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातील वाघांच्या मृत्यूच्या घटना केवळ व्याघ्र प्रकल्पांपुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत. पेंच, ताडोबा-अंधारी आणि नवेगाव-नागझिरा यांसारख्या व्याघ्र प्रकल्पांसह चंद्रपूर, ब्रह्मपुरी, नागपूर, गोंदिया, भंडारा, यवतमाळ, अमरावती आणि रामटेक या वनक्षेत्रांमध्येही वाघांच्या मृत्यूच्या घटना नोंदविण्यात आल्या आहेत.
विशेष म्हणजे, अनेक वाघांचा मृत्यू व्याघ्र प्रकल्पाबाहेरील अधिवासांमध्ये झाला आहे. त्यामुळे वाघांचे जंगलाबाहेरील वाढते स्थलांतर आणि त्यासोबत निर्माण होणारे धोके पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहेत. वाढती वाघसंख्या आणि मर्यादित अधिवास यामुळे वन्यजीव व्यवस्थापनासमोर नवी आव्हाने निर्माण होत आहेत.वन्यजीव तज्ज्ञांच्या मते, व्याघ्र प्रकल्पांच्या बाहेरील अधिवासांचे संरक्षण करणे, वन्यजीवांच्या नैसर्गिक स्थलांतरासाठी आवश्यक मार्गिका अर्थात कॉरिडॉरचे संवर्धन करणे, मानव-वाघ संघर्ष कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविणे आणि प्रत्येक वाघाच्या मृत्यूचे शास्त्रीय पद्धतीने विश्लेषण करणे ही काळाची गरज बनली आहे.
महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशानंतर देशातील इतर राज्यांमध्येही वाघांच्या मृत्यूच्या घटना समोर आल्या आहेत. कर्नाटक, तामिळनाडू, आसाम, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, केरळ, छत्तीसगड, ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, गोवा आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांमध्येही वाघांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. काही राज्यांमध्ये वाघांच्या अवयवांच्या जप्तीची प्रकरणेही समोर आली आहेत.
यंदा मृत्यू झालेल्या वाघांमध्ये प्रौढ, उपप्रौढ तसेच बछड्यांचाही समावेश आहे. विशेषतः अनेक बछड्यांच्या मृत्यूची नोंद झाल्याने भविष्यातील वाघसंख्येवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता वन्यजीव तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.वन्यजीव अभ्यासकांच्या मते, देशात आणि महाराष्ट्रात वाघांची वाढती संख्या ही संवर्धनाच्या दृष्टीने सकारात्मक बाब असली, तरी अधिवासावर वाढणारा ताण, मानवी हस्तक्षेप, नैसर्गिक संघर्ष तसेच अन्य कारणांमुळे वाघांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे केवळ वाघसंख्या वाढविण्यावर भर न देता त्यांच्या सुरक्षित अधिवासाचे संरक्षण करणे अधिक महत्त्वाचे ठरणार आहे.