५ दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

मात्र ३१ जुलैनंतर मान्सूनला पुन्हा ब्रेक लागण्याची शक्यता

    दिनांक :23-Jul-2026
Total Views |
मुंबई
heavy rain alert  यंदा मान्सूनचे आगमन तब्बल एक महिना उशिराने झाल्यानंतर जुलै महिन्यातही उन्हाचा आणि पावसाचा लपंडाव सुरूच राहिला. त्यामुळे अनेक भागांत अपेक्षित पाऊस झाला नव्हता. मात्र, सध्या उत्तरेकडे निर्माण झालेली दोन सायक्लोनिक सर्क्युलेशन, तसेच अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून येणारे जोरदार वारे यामुळे मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे.
 

maharashtra weather update: heavy rain alert for 5 days, monsoon break likely after july 31 
या अनुकूल हवामान प्रणालींमुळे पुढील पाच दिवस महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. 21 जुलैपासून राज्यातील अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मात्र, ही पावसाची मालिका फार काळ कायम राहणार नसल्याचा अंदाज असून, 31 जुलैनंतर मान्सूनच्या प्रवासाला पुन्हा एकदा ब्रेक लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर उकाड्यात वाढ होण्याचा अंदाज हवामान अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.दरम्यान, राज्यातील इतर भागांत पावसाची स्थिती सुधारत असताना मराठवाड्यात मात्र पावसाची प्रतीक्षा कायम आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली या आठ जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने सध्या कोणताही मोठा पावसाचा इशारा दिलेला नाही. या भागांत केवळ रिमझिम किंवा तुरळक पावसाची शक्यता आहे.
 
 
 
 पावसाचा जोर कायम
हवामान विभागाने यंदा मराठवाड्यात 80 टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, आतापर्यंत या भागात केवळ 20 ते 21 टक्के पाऊस झाल्याने हा अंदाज पूर्ण होणार का, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गेल्या 24 तासांच्या आकडेवारीनुसार, विदर्भ आणि मराठवाड्यात सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे.
दुसरीकडे, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव वाढल्याने कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. आज जुलै महिन्यातील दुसरी सर्वात मोठी भरती येणार असून, समुद्रात सुमारे चार मीटर उंच लाटा उसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. किनारपट्टी भागात ताशी 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज असून, प्रशासनाने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे आणि किनारी भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.दरम्यान, जुलै महिन्याच्या अखेरीस मान्सूनला ब्रेक लागल्यास राज्यातील शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या समस्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील शेतकरी अद्यापही मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. अल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे मान्सूनच्या वाटचालीत निर्माण होणारे अडथळे आगामी काळात बळीराजासाठी चिंतेचा विषय ठरू शकतात. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात मान्सूनची कामगिरी कशी राहते, याकडे शेतकरी आणि प्रशासनाचे लक्ष लागले आहे.