वॉशिंग्टन,
b 1 lancer bomber अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत असताना अमेरिकेने आपल्या लष्करी कारवाईत अत्यंत शक्तिशाली बी-१ लान्सर बॉम्बरचा प्रथमच वापर केला आहे. इराणमधील इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सच्या (IRGC) ठिकाणांना लक्ष्य करण्यासाठी या लांब पल्ल्याच्या बॉम्बरचा वापर करण्यात आल्याचे समोर आले आहे. या कारवाईमुळे दोन्ही देशांमधील संघर्ष आणखी धोकादायक ठरतो आहे कि काय असा संशय व्यक्त केला जात आहे.
अमेरिकन अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सुमारे १२ दिवसांपूर्वी संघर्ष पुन्हा सुरू झाल्यानंतर बी-१ लान्सर बॉम्बरचा प्रत्यक्ष लष्करी मोहिमेत वापर होण्याची ही पहिलीच वेळ आहे. या बॉम्बरच्या वापरामुळे अमेरिकेने इराणविरोधातील लष्करी मोहीम मोठ्या प्रमाणावर विस्तारण्याची तयारी सुरू केल्याचे संकेत मिळत असल्याचे मानले जात आहे. ऑनलाइन विमान निरीक्षण करणाऱ्या संकेतस्थळांवर या बॉम्बरने ब्रिटनमधील एका हवाई तळावरून उड्डाण केल्याची माहिती समोर आली आहे.
बी-१ लान्सर हे अमेरिकेच्या हवाई दलातील अत्यंत शक्तिशाली बॉम्बर विमानांपैकी एक आहे. कमी उंचीवर ध्वनीच्या वेगापेक्षा अधिक वेगाने उड्डाण करण्याची क्षमता या विमानात आहे. हे विमान मोठ्या प्रमाणात बॉम्ब तसेच अनेक क्रूझ क्षेपणास्त्रे वाहून नेऊ शकते. त्यामुळे इराणविरोधातील कारवाईत या विमानाचा वापर हा अमेरिकेच्या लष्करी मोहिमेतील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
मात्र, अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने (सेंटकॉम) आपल्या अधिकृत निवेदनात बी-१ बॉम्बरच्या मोहिमेचा थेट उल्लेख केलेला नाही. अमेरिकन सैन्याने इराणची लष्करी केंद्रे, सागरी क्षमता, विमानांचे हँगर्स, ड्रोन साठवणूक केंद्रे आणि लष्करी रसद तळांवर हल्ले केल्याचे सांगण्यात आले आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतील सागरी वाहतुकीला धोका निर्माण करण्याची इराणची क्षमता कमी करणे हा या कारवाईमागील उद्देश असल्याचे अमेरिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इराणविरोधात आणखी मोठ्या लष्करी कारवाईचा विचार करत असल्याचे वृत्त आहे. अमेरिकन आणि इस्रायली अधिकाऱ्यांच्या मते, आगामी काळात संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर हल्ले सुरू राहिल्यास इराणमधील पूल आणि वीज प्रकल्पांवर हल्ले करण्याचा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.
अमेरिकेच्या हल्ल्यांनंतरही इराणने माघार घेतलेली नसून, या प्रदेशातील अमेरिकेच्या लक्ष्यांवर हल्ले सुरूच ठेवले आहेत. दोन्ही देशांकडून एकमेकांना गंभीर परिणामांची धमकी दिली जात आहे.b 1 lancer bomber इराणनेही अमेरिकेचे मित्र असलेल्या आखाती देशांमधील पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे संघर्षाचा विस्तार होऊन त्याचे परिणाम संपूर्ण मध्यपूर्वेवर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या संघर्षात येमेनमधील हुथी बंडखोरांच्या हालचालींमुळे आणखी एक आघाडी उघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इराणच्या पाठिंब्याने हुथींनी लाल समुद्रातील सौदी अरेबियाच्या बंदरांवर नाकेबंदी जाहीर केल्याचे वृत्त आहे. सौदी जहाजांवर पहिला हल्ला झाल्याची माहितीही समोर आली आहे. बाब अल-मंदेब परिसरात हल्ल्यांचा धोका वाढल्याने अनेक व्यापारी जहाजांनी आपले मार्ग बदलण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्यासाठी राजनैतिक पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. कतार आणि ओमानच्या मध्यस्थीने युद्ध टाळण्यासाठी आणि सामुद्रधुनीतील वाहतूक पूर्ववत करण्यासाठी चर्चा सुरू आहे. मात्र, इराणच्या नेतृत्वाने अद्याप नवीन प्रस्ताव स्वीकारलेला नसल्याने या प्रयत्नांना ठोस यश मिळालेले नाही. जॉर्जियातील एका भाषणात ट्रम्प यांनी इराणला मोठा धक्का बसल्याचा दावा करत ते लवकरच करारासाठी तयार होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.