मारेगाव तालुक्यात 81 शिक्षकांची पदे रिक्त

-विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात -भाजपा तालुकाध्यक्ष अविनाश लांबट यांचे निवेदन

    दिनांक :23-Jul-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
मारेगाव, 
avinash-lambat : मारेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये तब्बल 81 शिक्षकांची पदे रिक्त असल्याने हजारो विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होत असल्याची बाब समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे मारेगाव तालुकाध्यक्ष अविनाश लांबट यांनी मारेगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकाèयांमार्फत जिल्हाधिकारी तथा जिल्हा खनिज कल्याण निधी अध्यक्ष यांना निवेदन देऊन जिल्हा खनिज कल्याण निधीतून कंत्राटी शिक्षकांची तातडीने नियुक्ती करण्याची जोरदार मागणी केली आहे.
 
 
 
y23July-Avinash
 
 
 
तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांच्या अभावामुळे एकाच शिक्षकावर अनेक वर्गांचा भार पडत आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे नियमित अध्यापन विस्कळीत होत असून शिक्षणाच्या गुणवत्तेवर मोठा परिणाम होत आहे. विशेषतः मारेगाव हा दुर्गम व आदिवासीबहुल तालुका असल्याने येथील विद्यार्थ्यांना आधीच अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यात शिक्षकांची मोठ्या प्रमाणावर असलेली रिक्त पदे ही विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणारी बाब असल्याचे लांबट यांनी नमूद केले आहे.
 
 
 
प्रधानमंत्री खनिज कल्याण निधी अंतर्गत शिक्षण क्षेत्रासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची तरतूद असल्याने, या निधीतून 81 कंत्राटी शिक्षकांची तातडीने नियुक्ती करून सर्व रिक्त पदे भरावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळेल आणि ग्रामीण व आदिवासी भागातील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
 
 
शासनाने शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देत तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून न निघणारे ठरेल. त्यामुळे प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे केवळ कागदोपत्री न पाहता तातडीने सकारात्मक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. यावेळी भाजपा पदाधिकारी, समर्थक व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.