४० वर्षांनंतर पुन्हा एकत्र येणार मीनाक्षी शेषाद्री आणि जॅकी श्रॉफ

    दिनांक :23-Jul-2026
Total Views |
मुंबई

meenaakshi seshadri ८०-९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर होत्या. लग्नानंतर त्यांनी अभिनय क्षेत्रापासून अंतर ठेवत परदेशात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला होता. आता त्या पुन्हा अभिनय क्षेत्रात पुनरागमन करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांचे हे कमबॅक ४० वर्षांपूर्वीच्या सहकलाकार जॅकी श्रॉफ यांच्यासोबत होणार असल्याचे म्हटले जात आहे.
 

meenaakshi seshadri and jackie shroff reunite after 40 years for nanavati vs nanavati 
मिळालेल्या माहितीनुसार, मीनाक्षी शेषाद्री आणि जॅकी श्रॉफ पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. मात्र, यावेळी हा चित्रपट नसून वेब सीरिज असल्याची माहिती समोर येत आहे. ‘मिड-डे’च्या वृत्तानुसार, मीनाक्षी शेषाद्री या विपुल शाह यांच्या ‘नानावती vs नानावती’ या वेब सीरिजच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पुनरागमन करण्याची शक्यता आहे. या सीरिजमध्ये त्यांच्यासोबत जॅकी श्रॉफ यांचीही महत्त्वाची भूमिका असणार असल्याचे सांगितले जात आहे.
मीनाक्षी शेषाद्री आणि जॅकी श्रॉफ ही जोडी यापूर्वी १९८३ मध्ये प्रदर्शित झालेल्या सुपरहिट ‘हीरो’ चित्रपटातून प्रेक्षकांसमोर आली होती. याशिवाय दोघांनी ‘दहलीज’ आणि ‘अल्लाह रक्खा’ या चित्रपटांमध्येही एकत्र काम केले होते. मात्र, ‘हीरो’ हा त्यांचा सर्वात यशस्वी चित्रपट ठरला होता. आता अनेक वर्षांनंतर ही जोडी पुन्हा एकदा पडद्यावर पाहायला मिळणार असल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
‘नानावती vs नानावती’ या वेब सीरिजमध्ये मीनाक्षी शेषाद्री आणि जॅकी श्रॉफ यांच्यासोबत भाग्यश्री, राम कपूर आणि अनुप्रिया गोयनका हे कलाकारही प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार असल्याची चर्चा आहे. ही सीरिज आठ भागांची असणार असून तिचे शूटिंग अंधेरी पश्चिम येथे होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, सीरिजच्या प्रदर्शनाची अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.काही दिवसांपूर्वी मीनाक्षी शेषाद्री पुन्हा भारतात स्थायिक झाल्याच्या चर्चा होत्या. अभिनय क्षेत्रात पुनरागमन करण्यासाठी त्या मुंबईत कायमस्वरूपी राहणार असल्याचेही समोर आले होते. मुंबईत परतल्यानंतर त्यांना मोठी वेब सीरिज मिळाल्याचे सांगितले जात असून, या माध्यमातून त्या ओटीटी विश्वात पदार्पण करणार आहेत.मीनाक्षी शेषाद्री यांनी लग्नानंतर चित्रपटांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यांचा शेवटचा चित्रपट ‘घातक’ (१९९६) होता. त्यानंतर त्यांनी बँकर हरीष मैसूर यांच्याशी विवाह केला आणि दोघे अमेरिकेत स्थायिक झाले. अमेरिकेत राहत असताना त्यांनी भरतनाट्यमचे वर्गही घेतले. आता अनेक वर्षांच्या विश्रांतीनंतर त्या पुन्हा अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.