मुंबई
mumbai police constable सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे मुंबई पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या व्हिडिओमध्ये एक पोलीस कर्मचारी एका तरुणाला धमकावताना दिसत असून, “पुन्हा दिसलास तर ५० ग्रॅमची पावडर टाकेन,” असे तो म्हणताना ऐकू येत आहे. या प्रकरणाचा उल्लेख मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत केला होता. त्यानंतर काही वेळातच गृहखात्याकडून संबंधित पोलिसाविरोधात कारवाई करण्यात आली.
या पोलिसाचे नाव पवन सांगळे असून तो सायन पोलीस ठाण्यात चालक म्हणून कार्यरत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर मुंबई पोलिसांबाबत विविध चर्चा सुरू झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी पवन सांगळे याला निलंबित केले आहे.
पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी या व्हिडिओचा संदर्भ देत पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. “माझ्याकडे एक व्हिडिओ आला. काही मुलं टॅक्सीने चालली होती. पोलीस म्हणतात ५० ग्रॅम पावडर टाकेन. हा पोलीस ड्रग्स सप्लायर आहे का? पोलिसांकडे पावडर मिळायला लागली का? हे काय चाललं आहे, तेच कळत नाही,” असे राज ठाकरे म्हणाले.
या प्रकरणावर महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांनीही आक्षेप घेत पोलीस महासंचालकांची भेट घेतली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी संबंधित पोलिसाला निलंबित करण्याची मागणी केली होती. “अशा प्रकारे धमकावणाऱ्या पोलिसावर कारवाई झाली पाहिजे, अशी आमची मागणी होती. पोलिसांनी ती मान्य केली. पोलीस ५० ग्रॅम पुडीची भाषा करतो. पोलीसच अंमली पदार्थांचे रॅकेट चालवत आहेत का? कांडला बंदरातून हे ड्रग्स येतात का? हा गंभीर विषय आहे. या प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या देखरेखीखाली चौकशी झाली पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, सोशल मीडियावर आणखी एका व्हिडिओची चर्चा सुरू आहे. CJPच्या समर्थनार्थ आंदोलन करणाऱ्या काही विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांना पोलीस व्हॅनमधून नेले जात होते. त्यावेळी रस्त्यावर उपस्थित असलेल्या काही आंदोलकांनी व्हॅनचा दरवाजा उघडला आणि ताब्यात घेतलेले विद्यार्थी एकामागून एक खाली उतरले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.या घटनेवरून सोशल मीडियावर दोन मतप्रवाह पाहायला मिळत आहेत. काही जण विद्यार्थ्यांच्या या कृतीचे समर्थन करत असून, त्याला आंदोलनातील धाडसी पाऊल म्हणत आहेत. तर काही जणांनी या प्रकाराला अराजकतेचे स्वरूप असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे दोन्ही व्हायरल व्हिडिओंवरून सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.