बुलडाणा,
healthcare-services-review : राज्य शासनाच्या माझे गाव, आरोग्य संपन्न गाव अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी राज्य समन्वयक अमोल पाटील यांनी गुरुवारी बुलढाणा जिल्ह्यातील विविध आरोग्य संस्थांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र हतेडी बुद्रुक (ता. बुलढाणा), प्राथमिक आरोग्य केंद्र किन्होळा (ता. चिखली), संबंधित उपकेंद्र तसेच ग्रामीण रुग्णालय, चिखली येथे भेट देऊन अभियानांतर्गत राबविण्यात येणार्या विविध उपक्रमांची माहिती घेतली. आरोग्य सेवा, जनजागृती उपक्रम, नोंदवही, नियोजन व प्रत्यक्ष अंमलबजावणीची त्यांनी सविस्तर पाहणी केली.भेटीदरम्यान जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजीत मंडाले, जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. मिलिंद जाधव आणि सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. निलेश जाधव यांच्यासमवेत अभियानाच्या प्रगतीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्यांशी संवाद साधून विविध उपक्रमांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला.
यावेळी राज्य समन्वयक अमोल पाटील यांनी माझे गाव आरोग्य संपन्न गाव अभियान शंभर टक्के यशस्वी करण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचार्यांनी प्रभावी नियोजन, विभागीय समन्वय आणि लोकसहभागाच्या माध्यमातून काम करण्याचे आवाहन केले. प्रत्येक गावापर्यंत दर्जेदार व सर्वसमावेशक आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. या भेटीदरम्यान तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र सरपाते, वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण जवंजाळ, डॉ. विष्णू इंगळे, डॉ. मोहम्मद मुदस्सीर तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे आणि ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. राज्य शासनाच्या माझे गाव आरोग्य संपन्न गाव अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक गावात प्रतिबंधात्मक, प्रोत्साहनात्मक आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा प्रभावीपणे पोहोचवून निरोगी ग्राम आणि सुदृढ समाज घडविण्यासाठी आरोग्य विभाग कटिबद्ध असल्याचे यावेळी सांगण्यात आले.