नागपूर
nagpur police चिंचभवनजवळील काही जंगलसदृष्य भागात एक १० वर्षीय मुलगा अंधारात फिरत होता. त्याला बेलतरोडी पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली. मात्र, तो बोलत नव्हता. शेवटी त्याला पोलिस ठाण्यात आणून बालसुरक्षा गृहात पाठविण्याची तयारी केली. मात्र, ठाणेदाराने आस्थेने विचारपूस केली असता ‘मुझे स्कूल जाना है, लेकिन मेरे पापा मुझे भेजते नही, इसलिये मै घर छोड के जा रहा हूं’ असे सांगितले. ठाणेदाराने मुलाला चॉकलेट आणि जेवण दिले. त्यानंतर मुलाने मध्यप्रदेशातील कुटुंबाबत माहिती दिली. रात्री ३ वाजता कुटुंबियांचा शोध घेऊन मुलाला ताब्यात दिले.
बेलतरोडी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक काढूरे, पोलिस हवालदार रवी आखरे यांचे पथक चिंचभवन परिसरात रात्री गस्त घालत होते. त्यांना अंधारात बसंत (काल्पनिक नाव) हा १० वर्षांचा मुलगा भटकलेला दिसला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि चौकशी केली. मात्र, तो मुलगा बोलत नव्हता. काहीच माहिती सांगत नव्हता. शेवटी त्याला पोलिसांनी पोलिस ठाण्यात आणले. अनाथ असल्याचे समजून त्या मुलाला बालसुरक्षागृहात पाठविण्यासाठी कागदपत्रे तयार करण्यात आले. काही वेळात त्याला नेण्यापूर्वी ठाणेदार रितेश अहेर यांनी मुलाला आपल्या कॅबिनमध्ये आणले. त्याला दोन चॉकलेट खायला दिली. त्याने भूक लागल्याचे सांगताच बिस्कीट दिले. त्याच्या हाती ठाणेदाराने मोबाईल दिला. त्यानंतर तो मुलगा बोलायला लागला. त्याने मध्यप्रदेशमधील बालाघाट येथील असल्याचे त्याच्या बोलण्यातून कळाले. तो चवथ्या वर्गात शिकत असून शाळेच जाण्याची आवड असल्याचे त्याने सांगितले. मात्र, माझे वडिलांना दारुचे व्यसन असून काका माझा सांभाळ करतात. वडिल नागपुरात विमानतळाजवळ एका परिसरात बांधकामावर मजूर असल्याचे त्याने सांगितले. ‘मला शाळेत जायला आवडते. आम्ही खूप गरीब आहोत, म्हणून माझ्या वडिलाने मला नागपुरात आणले. शाळेचा खर्च झेपत नसल्यामुळे मी आता वडिलांजवळ बांधकामच्या ठिकाणी दिवसभर खेळतो,’ अशी माहिती त्याच्या तोंडून समोर आली.
कुटुंबियांचा घेतला शोध
ठाणेदार अहेर यांनी शासकीय वाहनात मुलाला बसवले आणि मुलाच्या कुटुंबियांचा शोध घेण्यासाठी रात्री दोन वाजता निघाले. काही वस्तीतील बांधकामावर जाऊन चौकशी केली. शेवटी चिंचभवन वस्तीत गेल्यानंतर मुलाने इमारत ओळखली. येथेच वडिल राहत असल्याचे सांगितले. मुलाला वाहनातून खाली उतरवले असता तो पळतच वडिलाच्या तंबूकडे गेले. वडिल दारुच्या नशेत पडलेले होते. तर काळजीत पडलेल्या काकाने बसंतला छातीशी कवटाळले.
... मुलाला पुन्हा शाळेत घालू
बसंतच्या वडिलाने आणि काकाने गरिब परिस्थितीमुळे मुलांचा सांभाळ आणि शिक्षणाचा खर्च झेपत नसल्याची कबुली दिली. मात्र, मुलाला शाळा शिकण्याची ओढ बघता त्याला आम्ही पुन्हा शाळेत घालू, असे आश्वासन पोलिसांना दिला. मुलाच्या वडिल आणि काकाने पोलिसांचे आभार मानले आणि यानंतर त्याची काळजी घेण्याचे आश्वासन दिले.