नाशिक
nashik trimbakeshwar त्र्यंबकेश्वर शहरात वादळी वाऱ्यामुळे झालेल्या दुर्घटनेत पायी जाणारे तीन भाविक जखमी झाले. हवेतून उडून आलेले पत्रे अचानक त्यांच्या अंगावर कोसळल्याने ही घटना घडली. जखमींना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, यातील यवतमाळ येथील एका भाविकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
हवामान खात्याने नाशिकच्या घाटमाथ्यावरील परिसरासाठी बुधवारी रेड अलर्ट आणि गुरुवारी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार बुधवारी दिवसभर त्र्यंबकेश्वर परिसरात जोरदार पाऊस झाला. सायंकाळनंतर वादळी वाऱ्याचा वेग वाढला आणि रात्री सुमारे ८ वाजता त्र्यंबकेश्वर शहरातील मेनरोड परिसरात ही दुर्घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, सोसाट्याच्या वाऱ्यामुळे एका रहिवाशाच्या घरावरील पत्रे उडून रस्त्यावर येऊन पडली. त्याचवेळी आठ भाविकांचा एक समूह या मार्गावरून जात होता. त्यापैकी तिघे जण या पत्र्याखाली अडकून जखमी झाले.
जखमींमध्ये अमित सुभाष आढे (वय २०, रा. जोडमोहा, ता. कळम, जि. यवतमाळ) यांचा समावेश असून ते गंभीर जखमी झाले आहेत. मुसळधार वादळी पावसाची पर्वा न करता स्थानिक नागरिक सुयोग वाडेकर आणि कौस्तुभ देशपांडे यांनी तत्परता दाखवत आढे यांना दुचाकीवरून त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.या घटनेची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी घेतली असून, त्यांनी तहसीलदार आणि पोलीस यंत्रणेला परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता हेही जिल्हा आपत्ती व्यवस्थापन शाखेतील वैद्यकीय पथकाच्या संपर्कात आहेत.दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील घाटमाथ्यावरील भागात मुसळधार पाऊस सुरू असून, रात्रीपासून वादळी वारेही वेगाने वाहत आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, तसेच रात्रीच्या वेळी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.