गोंदिया,
bandh-in-gondia : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आवाहनानुसार गुरुवारी २३ जुलै रोजी वंचित बहूजन आघाडीच्या वतीने राज्यभर महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. मात्र, गोंदिया जिल्ह्यात या बंदला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचे दिसून आले. शहरातील जनजीवन, बाजारपेठा व वाहतूक सुरळीत सुरू असल्यामुळे बंदची तीव्रता दिसून आली नाही. दरम्यान, पदाधिकार्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करत निदर्शने केली. त्यानंतर उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत यांच्यामार्फत राष्ट्रपतींच्या नावे निवेदन सादर करण्यात आले.

आंदोलनादरम्यान केंद्र सरकारच्या विद्यार्थी विरोधी धोरणांचा निषेध करण्यात आला. विशेषतः केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. विशेष म्हणजे, गोंदिया जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडी पक्षाची संघटनात्मक ताकद तुलनेने मर्यादित असल्याने बंदची व्यापक अंमलबजावणी होऊ शकली नाही. त्यामुळे आंदोलनाचे स्वरूप प्रतिकात्मक राहिले. तथापि, घोषणाबाजी आणि निवेदनाद्वारे पक्षाने आपली भूमिका स्पष्टपणे मांडण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनाला भारतीय कम्युनिस्ट पक्ष, आयटक तसेच समविचारी सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा. सतीश बन्सोड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात राजू राहुलकर, नरेंद्र बोरकर, प्रकाश वासनिक, प्रफुल लांजेवार, प्रकाश डोंगरे, मंगलदास वंजारी, राजेंद्र बन्सोड, देवदास डाहाट, रूपदास मेश्राम, अंकुश रामटेके, हेमंत बडोले, वामन मेश्राम, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे मिलिंद गणवीर, हौसलाल रहांगडाले, रामचंद्र पाटील, अरुणा गणवीर, आयटकचे विनोद शहारे, महेंद्र कटरे, देवेंद्र मेश्राम, सुरेश रंगारी यांच्यासह भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष देवाराम मेश्राम, मिलन गजभिये, अनिल मेश्राम, सुरेंद्रकुमार खोबरागडे, बी. जी. वासनिक आदी सहभागी झाले होते.