ओडिशा
odisha wedding tragedy ओडिशातील ढेंकानाल जिल्ह्यात घडलेल्या भीषण रस्ते अपघाताने लग्नाच्या आनंदावर क्षणात शोककळा पसरली आहे. वऱ्हाड्यांनी भरलेली महिंद्रा एक्सयूव्ही कार अनियंत्रित होऊन तलावात कोसळल्याने पाच जणांचा बुडून मृत्यू झाला, तर दोन जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. या घटनेनंतर दोन्ही गावांमध्ये शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बांगुरसिंह गावातील रहिवासी अभिषेक साहू यांचा विवाह ढेंकानाल सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंदुपुर गावातील रोहित कुमार पृष्टि यांच्या मुलीशी ठरला होता. विवाह सोहळ्यासाठी बांगुरसिंह गावातून अनेक वाहनांमधून वऱ्हाडी इंदुपुरकडे निघाले होते. याच वेळी रात्रीच्या अंधारात वऱ्हाड्यांनी भरलेली एक कार रस्त्यावर अनियंत्रित झाली आणि थेट तलावाच्या पाण्यात जाऊन पडली.कारमधील प्रवासी पाण्यात अडकले आणि श्वास गुदमरल्याने पाच जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मोठ्या प्रयत्नांनंतर कार पाण्यातून बाहेर काढली. त्यानंतर ढेंकानाल सदर पोलीसही घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह ताब्यात घेऊन ढेंकानाल जिल्हा मुख्यालय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले.या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची ओळख बांगुरसिंह गावातील राम साहू (वय २५), अविनाश साहू (वय २६), राकेश कुमार साहू (वय २५), चंद्रकांत स्वाईं (वय २७) आणि वराच्या मावशीचा मुलगा अभिजीत साहू अशी झाली आहे.
प्रत्यक्षदर्शी दुर्वासा साहू यांनी या दुर्घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, “वऱ्हाडी बांगुरसिंहहून इंदुपुरकडे जात होते. छाटिया जवळ एका वळणावर तलाव आहे, तिथे त्यांची कार कोसळली. आम्ही घटनास्थळी पोहोचलो तेव्हा कार पूर्णपणे पाण्यात बुडालेली होती. आम्ही चार-पाच जणांनी तलावात उतरून लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र आम्हाला यश आले नाही. त्यानंतर सर्व ग्रामस्थ मदतीसाठी आले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. कारमध्ये एकूण सात जण होते. दोन जण कसाबसा बाहेर आले, मात्र दरवाजा लॉक झाल्यामुळे उर्वरित पाच जण बाहेर पडू शकले नाहीत आणि त्यांचा मृत्यू झाला.”
या घटनेनंतर पोलीस संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून अपघात नेमका कशामुळे झाला, याचा शोध घेत आहेत. या दुर्घटनेमुळे बांगुरसिंह आणि इंदुपुर या दोन्ही गावांमध्ये दुःखाचे वातावरण आहे. ज्या घरात लग्नाच्या आनंदाची तयारी सुरू होती, तिथे आता शोककळा पसरली आहे. जिल्हा रुग्णालयात मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश पाहायला मिळत आहे. काही क्षणांतच लग्नाचा आनंद दुःखात बदलला आहे.